27 September 2020

News Flash

पोलीस कुटुंबीयांची संघटना उभारण्याचा सोलापुरात प्रयत्न

छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर उपचारासाठी विलंब केल्यावरून एका निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणीमुळे

| January 5, 2014 04:26 am

छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर उपचारासाठी विलंब केल्यावरून एका निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तिघे पोलीस निलंबित झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलिसांना कायद्यानुसार संघटना बांधता येत नसल्यामुळे आता त्यांच्या कुटुंबीयांची संघटना बांधण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
या संदर्भात पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांची भेट घेऊन लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, आपले प्रशासन पोलीस कुटुंबीयांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असून, त्यापलीकडे काही मागण्या असल्यास कायद्याच्या चौकटीत राहून त्याचे निराकरण होईल. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांच्या संघटनेची स्थापना होऊन त्याद्वारे एकूण पोलीस प्रशासन व्यवस्थेला आव्हान दिले जाणार असेल तर ते चुकीचे आहे. त्यासंदर्भात आपण लक्ष ठेऊन आहोत.
गेल्या ३१ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात पहाटे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला उपचारासाठी मदत न करता उलट उध्दट वर्तन केल्यामुळे तेथील एका निवासी डॉक्टरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण वायकर व त्यांच्या दोघा सहकाऱ्यांनी मारहाण केली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले. यात वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांविरूध्द गुन्हा नोंद होऊन त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. या प्रकरणात विविध राजकीय व सामाजिक संघटना निवासी डॉक्टर तथा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आणि पोलिसांच्या समर्थनार्थ उभ्या ठाकल्या आहेत. यात पोलीस अधिकाऱ्यांवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त होत असतानाच इकडे पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे. कायद्यानुसार आपणास संघटना उभारता येत नाही किंवा ‘आवाज’ उठविता येत नसल्यामुळे पोलिसांनी आपल्या कुटुंबीयांना पुढे करून संघटना स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत.
आश्चर्य म्हणजे पोलीस कुटुंबीयांची संघटना उभारण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात ‘पाटीलकी’ करणाऱ्या व पोलिसांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने पुढाकार घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पोलीस कुटुंबीयांच्या संघटना स्थापनेसाठी काल शुक्रवारी रात्री आठ वाजता पोलीस मुख्यालयात बैठकही बोलावण्यात आली होती. तसे संदेश सोशल मेडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले होते.
परंतु त्याच सुमारास शहरात एका भागात दोन गटांत मोठी हाणामारी झाल्यामुळे त्याठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना धाव घ्यावी लागली. त्यामुळे ही बैठक स्थगित झाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2014 4:26 am

Web Title: solapur try to set up an organization of police families
Next Stories
1 भविष्यातील गुलामगिरीच्या प्रतिकारासाठी जनभाषा हे हत्यार
2 विजेचे दर कमी करण्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर – नारायण राणे
3 पोलीस निरीक्षकाची डॉक्टरला मारहाण संवेदनशीलतेच्या भावनेतून क्षम्य – आडम
Just Now!
X