सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केली. धनगर समाजाने यासाठी राज्य सरकारकडे पाठ पुरावा केला होता. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या या निर्णयाचा अखिल भारतीय शिवा संघटनेने विरोध केला आहे. राज्यभरात मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळून या निर्णयाचा विरोध करु, असे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे सोलापूरमधील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

सोलापूर जिल्ह्यासाठी २००४ मध्ये सोलापूर विद्यापीठाची उभारणी झाली. या विद्यापीठाशी ११८ महाविद्यालये जोडलेली आहेत. या विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यापैकी एकाचे नाव द्यावे, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजातर्फे करण्यात आली होती. यासाठी मंत्रालयात शिवा वीरशैव युवक संघटनेने पाठपुरावा केला होता. २०१३ साली धनगर समाजाने अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले होते.

धनगर समाजाची मागणी अखेर पूर्ण झाली असून रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण घोषणा केली. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याचे त्यांनी जाहीर केले. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने वीरशैव लिंगात समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर वीरशैव लिंगायत समाजाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो. सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. शिवा संघटना मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळून निषेध करणार, आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा अखिल भारतीय शिवा संघटनेचे नेते मनोहर धोंडे यांनी दिला. तर वीरशैव आघाडीच्या श्वेता हुल्ले यांनी देखील सरकारवर टीका केली. लिंगायत बांधवांची मनं दुखावली असून धनगर समाजाला आरक्षण देता आले नाही म्हणून सरकारने विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले.  सरकारने हुकूमशाही पद्धतीने हा निर्णय घेतला, अशी टीका त्यांनी केली. तब्बल २८ संघटनांनी या विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, यासाठी वेगवेगळ्या नावांचा आग्रह धरला होता.