सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथे शेतातील ऊसतोडणीचे काम करताना एका महिला मजुराचा झालेला मृत्यू चक्कर आल्यामुळे नव्हे तर तिचा खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. हुंडय़ासाठी हा खून तिच्या पतीसह सासू-सासऱ्याने मिळून केल्याची फिर्याद मृताच्या वडिलांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.

सामक्का कृष्णा राठोड (वय २४, रा. कोठाळा-वंजारवाडी, ता. सोनपेठ, जि. परभणी) असे खून झालेल्या ऊसतोड मजूर महिलेचे नाव आहे. तिचे वडील वसंत रामभाऊ पवार (वय ४८, रा. ब्रह्मपुरी, साळापुरी, जि. परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सामक्का हिचा पती कृष्णा राठोड, सासू नीलाबाई साहेबराव राठोड व सासरा साहेबराव शामराव राठोड यांच्या विरोधात खुनासह हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणीच्या कामाकरिता आलेल्या ऊतसोड मजुरांच्या टोळ्यांमध्ये मृत सामक्का राठोड ही पती व सासू-सासऱ्यासह सोलापुरात आली होती. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथे उसाच्या फडात ऊसतोड करताना सामक्का ही अचानकपणे चक्कर आल्याने खाली कोसळली आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली होती. परंतु मृताचे वडील वसंत पवार यांनी आपल्या मुलीचा खून झाल्याची बाब पोलिसांच्या नजरेत आणली आहे. जावई कृष्णा राठोड, सासरा साहेबराव व सासू नीलाबाई यांनी माहेरातून पैसे घेऊन येत नाही म्हणून मृत सामक्का हिचा वारंवार छळ केला. परंतु त्याची पूर्तता न केल्याने पतीसह सासू व सासऱ्याने सामक्का हिचा काठीने डोक्यात मारून व गळा दाबून खून केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

तरुणाचा खून

बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे एका अवैध हातभट्टी दारू कारखान्यात संजय देवीदास चव्हाण या तरुणाचा खून झाला. या खून करण्यामागचे कारण लगेच स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पोपट सोबा राठोड, ज्ञानू लालू राठोड, आकाश नानू राठोड, रवी नामदेव राठोड (सर्व रा. भातंबरे) व शिवाजी गोपीनाथ चव्हाण (रा. बोरमाळ तांडा, ता. जि. उस्मानाबाद) या सहाजणांविरुध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.