टाकाऊ वाहनांपासून पर्यावरणपूरक वाहन

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार बनवली आहे. ‘आऊट ऑफ द बॉक्स’ या संकल्पनेद्वारे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध तंत्रांचा वापर करून या आदिवासीबहुल विद्यार्थ्यांनी ही प्रदूषणमुक्त कार तयार केली आहे.

वायू व ध्वनी प्रदूषणमुक्त असलेले हे वाहन असल्यामुळे येत्या काही काळात प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एन. परदेशी यांनी व्यक्त केला. प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित केलेल्या निधीमुळे ही सोलर कार महिनाभरात यशस्वीरीत्या तयार करण्यात आली. विशेष म्हणजे या वाहनांमध्ये इंजिन नसले तरी त्यात लावलेल्या विद्युत मोटारीमुळे त्याच सक्षमतेने व त्याच वेगाने ती रस्त्यावर किंवा खाचखळग्यात धावू शकते. यासंबंधीची प्राथमिक चाचणीही यशस्वी झालेली आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

आवश्यक नसलेल्या आणि फेकून दिलेल्या टाकाऊ  वाहनांपासून अगदी कमी खर्चात हे वाहन तयार करण्यात आले. कोणत्याही ऋतूमध्ये हे वाहन कोणताही खंड न पडता धावू शकणार आहे. त्यामध्ये तशी प्रणाली बसवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर बनवलेले आणि प्राथमिक तत्त्वावर यशस्वी तपासण्या पूर्ण झालेले हे वाहन भविष्यातील पेट्रोल-डिझेलचा तुटवडा लक्षात घेता वाहतुकीसाठी प्रभावी ठरेल आणि त्याचबरोबरीने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठीही या वाहनाचा तितकाच फायदा होणार आहे, असे येथील विद्युत शाखेचे तंत्रशिक्षक पी.बी. अहिर यांनी सांगितले.

कमी खर्चात, कमी वेळेत बनवलेले हे वाहन रात्रीच्या वेळीही साठवलेल्या ऊर्जेतून सुमारे ५५ किलोमीटपर्यंत जाऊ  शकते. या वाहनाला आणखी अद्ययावत बनवायचा मानस असून विद्यार्थ्यांमार्फत अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा पुरेपूर वापर कसा करून घेता येईल आणि कमी भांडवलात जास्त फायदा कसा करून घेता येईल, असा वैविध्यपूर्ण प्रयोग करण्याचा प्रशिक्षण संस्थेचा कल आहे.

मच्छीमारांसाठी सोलर नौका?

सोलर कार बनवल्यानंतर सोलर नौका बनवण्याचा मानस संस्थेचे निर्देशक जे. आर. पाटील यांनी व्यक्त केला. ही सोलर नौका मच्छीमारांसाठी फायद्याची ठरेल, असे त्यांनी सांगितले. सोलर वाहन आणखी अद्ययावत करायचे असून येत्या दोन महिन्यांत ते पूर्ण सक्षमतेने रस्त्यावर धावण्यासाठी तयार असेल. तसेच या सोलार वाहनाचे पेटंट घ्यायचे असून ते विविध ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

इंधनाचा होत असलेला वापर त्यामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता ही सोलार कार सर्वाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. या उपक्रमातून त्यांच्या अंतर्भूत कौशल्याचा सर्वागीण विकास होण्यास चालनाही मिळाली आहे.

– सुप्रिया भोईर, विद्यार्थिनी

टाकाऊपासून टिकाऊ  बनविल्याने भविष्यात वाहनांच्या टाकाऊ  साहित्यांचा पुरेपूर वापर होऊन त्यातून अशी पर्यावरणपूरक वाहने तयार केल्याने सर्वागाने ती फायदेशीर ठरतील. असे उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांनाही विविध विषयांवर प्रत्यक्षात अनुभव व कौशल्य अभ्यासायला मिळेल.

– पवन सोनवणे, विद्यार्थी