झांजरोळी लारपाडा हा केळवे रोड रेल्वे स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर असलेला पाडा. झांजरोळी धरणाच्या उभारणीवेळी स्थलांतरित झालेल्यांनी १९९६ मध्ये येथे वस्ती केली. मात्र २४ वर्षांपासून शासनाने वीजपुरवठा न केल्याने येथील रहिवाशांना अंधारातच जीवन काढावे लागते. मात्र आता येथे सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आली असून येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

झांजरोळी धरणाच्या क्षेत्रात वास्तव करणाऱ्या आठ ते दहा कुटुंबीयांना बंधाऱ्याच्या उभारणीच्या वेळी १९९६ मध्ये स्थलांतरित करण्यात आले. या कुटुंबीयांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाल्यानंतर ही मंडळी बंधाऱ्याच्या पूर्वेकडील भागात असलेल्या आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये स्थलांतरित झाली होती. लारपाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वसाहतीमध्ये सध्या आठ ते दहा कुटुंबे वास्तव करीत असून येथील रहिवासी भाजीपाला लागवड करून आपली उपजीविका करत आहेत. सध्या ६० नागरिक येथे राहतात. या वस्तीवरील मुले शिक्षण घेत आहेत, मात्र वीज नसल्याने त्यांना रात्रीचा अभ्यास करणे शक्य होत नव्हते.

या पाड्याला रॉकेलच्या दिव्यावर रात्री अवलंबून राहावे लागत असे. महावितरण कंपनीने बंधाऱ्यावरून या ठिकाणी वीजजोडण्या देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याकामी पाच ते सहा विजेचे खांबही उभारण्यात आले होते. मात्र वनविभागाच्या जागेतून वीजप्रवाह नेण्यास आक्षेप घेतल्याने हा संपूर्ण परिसर अजूनही रात्रभर अंधारात राहतो.
या भागामध्ये चिंच खरेदी करण्यासाठी आलेल्या मनोज चौधरी यांनी लायन्स क्लब ऑफ केळवेची सूत्रे हाती घेतल्यानंतर या पाडय़ावर सौरऊर्जा विद्युत प्रणाली बसवण्यासाठीचा प्रस्ताव मांडला. याकामी मुंबई येथील इतर संस्थांची मदत घेऊन सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या प्रत्येक घरात असलेल्या सौर प्रणालीमध्ये दोन दिवे लावण्याचे पॉइंट तसेच एक मोबाइल चार्जर पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे या पाड्यावरील विद्यार्थ्यांना रात्रीच्या प्रसंगी अभ्यास करणे शक्य होणार आहे.

रॉकेलचा तुटवडा
राज्य शासनाने रॉकेलच्या वितरणावर र्निबध आणले असल्याने स्वस्त दरामध्ये रॉकेलची उपलब्धता मर्यादित झाली आहे. झांजरोळी लारपाडा येथील या नागरिकांना रॉकेलच्या मर्यादेमुळे अनेकदा लाकडे पेटवून अंधारामध्ये वास्तव्य करावे लागत असे. या आदिवासी पाड्यावर सौर दिवे आले असले तरी आपल्या वस्तीवर कायमस्वरूपी विद्युत प्रवाह उपलब्ध व्हावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.