• ४०.५४ लाख कृषीपंपांची संख्या
  • 0२ कोटी एलईडी दिवे वितरित

राज्यात कृषीपंपांची संख्या ४० लाख ५४ हजारावर गेली असून भाजप सरकारच्या कारकीर्दीत दोन लाख १० हजार कृषीपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. अपारंपरिक उर्जानिर्मितीत ४०० मेगावॉटने वाढ झाली असून उर्जाबचतीसाठी दोन कोटी सात लाख एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले आहे.

कृषीपंपांची वीजथकबाकी वाढत असतानाच वीजजोडण्या देण्यावर मात्र भाजप सरकारच्या कारकीर्दीत मोठय़ा प्रमाणावर भर देण्यात आला आहे. २०१५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंत सुमारे दोन लाख १० हजार कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या. या वर्षी त्यासाठी २५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेत केंद्र सरकारने २१६४ कोटी रुपये राज्याला दिले असून त्यातून १२ लाख ४८ हजार ग्रामीण भागातील कुटुंबांना वीजजोडणी देण्यात येत आहे.  अपारंपरिक उर्जास्त्रोतातून वीजनिर्मिती वाढविण्यास प्राधान्य असून मार्च २०१६ रोजी असलेली ६९७८ मेगावॉट इतकी स्थापित क्षमता ३१ ऑक्टोबपर्यंत ७३६२ वर गेली आहे.त्यात उसाच्या चिपाडापासून वीजनिर्मिती सुमारे २५० मेगावॉटने वाढली आहे.

अटल सौर कृषी पंप योजनेला मात्र अजिबात प्रतिसाद नसून ७५४० पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवून ही योजना २०१५ पासून सुरु झाली. मात्र डिसेंबर अखेरीपर्यंत १६७४ कृषीपंप बसविण्यात आले.

राज्यात वीजबचतीसाठी दोन वर्षांत तीन कोटी ८६ लाख एलईडी दिवे वितरित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यापैकी दोन कोटी सात लाख दिवे वितरित करण्यात आले आहेत. या दिव्यांमुळे सुमारे २९३ मेगावॉटने वीजेची मागणी घटणे अपेक्षित आहे. वितरणासाठी सुमारे ५५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.