जम्मू काश्मीर येथील पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात औरंगाबादचे जवान किरण थोरात यांना वीरमरण आले. लष्कराच्या प्रवक्त्यांनी याबाबत रात्री उशिरा माहिती दिली. किरण थोरात हे औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडीचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आरती आणि दोन वर्षांची मुलगी आहे.

पाकिस्तानने सीमेवर उखळी तोफा, रायफली आणि छोट्या शस्त्रांनी अचानक हल्ला सुरु केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या गोळीबारात किरण थोरात हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सोमवार ते बुधवार या तीन दिवसांच्या कालावधीत भारताने पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. कृष्णा घाटीत ८ दिवसांआधीच म्हणजेच ३ एप्रिलला परभणीच्या शुभम मुस्तापुरे यांना वीरमरण आले होते. तर इतर ५ जण जखमी झाले होते.