शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे ठाकरे सरकारला भाजपाने टार्गेट केलेलं असताना भाजपाला एका जुन्या प्रकरणावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात भाजपाच्या तत्कालिन आमदारानं एका जवानाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात भाजपाचे तत्कालिन आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि इतरांच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

“२०१६ मध्ये भाजपचे तत्कालिन आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,” असं अनिल देशमुख म्हणाले.

“२०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

सरकार न्याय मिळवून देईल

“जवान सोनू महाजन यांच्यावर चाळीसगावचे खासदार उन्मेश पाटील यांच्या सांगण्यावरुन जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी तक्रार दाखल करुनही अद्याप खासदार पाटील यांना पोलिसांनी अटक का केली नाही? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता. तसेच महाविकास आघाडी सरकार या माजी सैनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल,” असंही त्यांनी म्हटलं होतं.