सैन्यात नोकरी करणाऱ्या पतीचे निधन झाले. संसदेवर हल्ला झाला होता तेव्हा रामदास जाधव जखमी झाले होते. नंतर त्यांचा अकाली मृत्यू झाला. उमादेवी जेव्हा १४ वर्षांच्या होत्या तेव्हा रामदास आणि  त्यांचा विवाह झाला होता. पतीचे निधन झाले तेव्हा केवळ ९ वी पर्यंत शिकलेली उमा खचली नाही. कारण तिलाही लढायचे होते. पदरी दोन मुले असताना सैन्यात जाण्याची जिद्द उमादेवीने बाळगली आणि अखेर त्यांना सैन्यात दाखल करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी खास प्रयत्न करून सैन्यात तिला भरती करता यावे म्हणून वयाची अटही शिथिल केली. सैनिकी शिक्षणासाठी नागपूर येथून लवकरच राजस्थानात पाठविले जाणार आहे.
चाकूर तालुक्यातील खुर्दळी येथील रामदास जाधव यांच्या पत्नीला २५ व्या वर्षी वैधव्य आले. अतिरेक्यांनी जेव्हा संसदेवर हल्ला केला होता, तेव्हा रामदास जाधव जखमी झाले होते. नंतर हृदयविकाराच्या धक्क्य़ाने त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा उमाच्या पदरी दोन मुले होती. ऋषिकेश आणि वैष्णवी या दोघांचा सांभाळ कसा करायचा, हा प्रश्न होता. सासर व माहेरचा तसा आधार नव्हताच. पण उमादेवीची जिद्द मोठी. खासगी नोकरी करून व बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी कुटुंब सावरले. तेव्हाच पुन्हा सैन्यात जायचे आणि पतीप्रमाणेच लढायचे, असे त्यांनी ठरविले. दरम्यान, त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमांत सहभाग नोंदविला. केंद्र सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने मार्च २०१४ मध्ये आयोजित राष्ट्रीय एकता शिबिरात महाराष्ट्राच्या महिला संघाच्या प्रमुख म्हणून त्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली. ‘यशदा’ येथेही प्रशिक्षण घेतले. मुलांना शिकवतानाच पदवीपर्यंतचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. याच दरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी करून पतीचे उर्वरित देशसेवेचे कार्य करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी शासनाला कळविले. तसा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावाही सुरू केला. पती निधनानंतर सहा वर्षांचा कालावधी लोटला होता. वयाची अट आडवी येत होती. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी ६ वर्षे ९ महिन्यांचा सैन्य दलात भरतीसाठी उशीर क्षमापित केला. वयोमर्यादा शिथील झाल्याने उमादेवी आता सैन्यात भरती झाल्या आहेत.  एका मराठमोळय़ा महिलेची सन्यात दाखल होण्याची जिद्द निश्चितच महिलांसाठी प्रेरणा देणारी आहे.