भारतीय सैन्य दलातील सैनिकाच्या गरोदर पत्नीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता भूम तालुक्यातील घुलेवाडी येथे घडली. घडल्या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना या महिलेस निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत मानसिक व शारीरिक त्रास सहन न झाल्याने महिलेच्या नातेवाईकांनी वाशी येथे प्राथमिक उपचार करून उस्मानाबाद येथे पुढील उपचारासाठी हलवले आहे.
शुक्रवारी त्रस्त महिलेने जिल्हाधिकार्यांना नातेवाईकांमार्फत निवेदन पाठवून घडला प्रकार कळविला असून याप्रकरणी आरोपींविरूध्द कडक कारवाईची मागणी तिने केली आहे. भूम व वाशी तालुक्याच्या सीमेवर घुलेवाडी येथील रहिवाशी असलेल्या एका सैनिकाचे दोन वर्षांपूर्वीच त्रस्त महिलेशी लग्न झाले. सध्या ते भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात आहेत. त्यांची पत्नी आठ महिन्यांची गरोदर आहे.
घुलेवाडी या सासरगावीच त्या राहत असून पाणीटंचाईमुळे त्यांना शौचासाठी उघड्यावर जावे लागते. गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सैनिकाची पत्नी शौचासाठी गेली होती. त्यावेळी गावातील गोकुळ बाजीराव गोपाळघरे या आरोपीने त्यांच्या हाताला धरून, खाली पाडून दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे त्यांची सासू व इतर महिला त्यांच्याकडे धावल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्या घाबरून गेल्या. त्यांना त्यांच्या सासू सासऱ्यांनी धीर दिला. त्यानंतर घडला प्रकार पोलिसांना सांगण्यासाठी त्यांना वाशी पोलीस ठाण्यात व शासकीय रूग्णालयात घेऊन जाऊ लागले. त्यावेळी तिथे आरोपी गोकुळ गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, भरत गोपाळघरे, विठ्ठल गोपाळघरे, गणेश गोपाळघरे, रतनबाई गोपाळघरे यांनी या महिलेसह त्यांच्या सासू-सासर्यांना जबर मारहाण केली.
बाजीराव गोपाळघरे याने त्यांच्या सासूच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. या प्रकरणी घाबरलेल्या सर्वांनीच वाशी येथील रूग्णालयात प्राथमिक उपचार घेवून उस्मानाबादच्या रूग्णालयात जीवाच्या भीतीने पुढील उपचार घेण्याचा मार्ग अवलंबला आहे.
त्रस्त महिलेचा दीर मुंबई येथे पोस्टात नोकरी करतो. त्यांना हा घडला प्रकार समजल्यानंतर त्यांनी तातडीने उस्मानाबाद गाठून घडला प्रकार जाणून घेतला. याप्रकरणी त्रस्त महिलेची लेखी तक्रार जिल्हाधिकार्यांना देण्यात आली असून वाशी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत या घटनेची कसल्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 31, 2019 9:10 pm