06 December 2019

News Flash

सोलापुरात कांद्याची उसळी; १५ हजारांचा उच्चांकी दर

सोलापुरात गेल्या महिनाभरापासून आवक होणाऱ्या कांद्याला राज्यात सर्वाधिक दर मिळत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सोलापुरात कांद्याला सोमवारी देशातील सर्वाधिक १५ हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. तर स्थिर दर मात्र त्या तुलनेत कमीच म्हणजे ४ हजार १०० रुपयांपर्यंत मिळाला. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत गेल्या महिन्यापासून कांद्याचा कमाल दर चांगलाच वधारला आहे.

सोमवारी दिवसभरात शेती बाजारात २३६ मालमोटारी भरून २९ हजार ६७७ क्विंटल कांद्याची उच्चांकी आवक होऊन त्यात कांद्याला कमाल दरदेखील तेवढाच उच्चांकी म्हणून म्हणजे तब्बल १५ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तर किमान दर २०० रुपये आणि स्थिर दर ४१०० रुपये मिळाला. या माध्यमातून सुमारे दहा कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचे सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सचिव मोहन निंबाळकर यांनी सांगितले.

सोलापुरात गेल्या महिनाभरापासून आवक होणाऱ्या कांद्याला राज्यात सर्वाधिक दर मिळत आहे. सुरूवातीचा उच्चांकी दर ६५०० रुपये होता. त्यात वेगाने उसळी मारत आता तब्बल १५ हजारांपर्यंत विक्रमी दर देण्यात आल्याने सर्वाच्या नजरा सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीकडे खिळल्या आहेत. सोमवारी कांद्याला देशात सर्वाधिक १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असताना त्याखालोखाल सुमारे ३५० क्विंटल कांदा प्रत्येकी १४ हजार रुपये दराने खरेदी करण्यात आला. सोलापुरात येणारा कांदा सोलापूर जिल्ह्य़ातून नव्हे तर शेजारच्या पुणे, नगर व नाशिक भागातून येत आहे. येणारा कांदा नवा नसून तर साठवणूक केलेला जुना कांदा आहे. यात कांद्याची साठेबाजी झाल्याची शंका उपस्थित होत असल्याने त्याकडे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही लक्ष घातले आहे. मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांनीही साठवणूक केलेला कांदा सोलापुरात आणल्याचे बाजार समितीचे सचिव निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on December 3, 2019 2:01 am

Web Title: solpur onion rate high akp 94
Just Now!
X