आश्वासन देऊनही वर्षभरापासून पूर्ण न झालेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्याच्या आवाहनास हजारो आदिवासी शेतकरी बांधवांनी प्रतिसाद दिला होता. सरकारच्या लेखी आश्वासनानंतर नाशिकहून निघणारा किसान सभेचा लाँग मार्च अखेर स्थगित झाला आहे. गिरीश महाजन आणि किसान महासभेचे प्रतिनिधी यांच्यात आज गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये तोडगा निघाला आहे.

गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत सांयकाळी पाच वाजेपासून किसान सभेच्या नेत्यांची बैठक सुरू होती. अखेर रात्री १० च्या सुमारास तोडगा निघाला आहे. शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. तसेच वन हक्क जमिनीचे दावे तीन महिन्यांच्या आत निकाली लावण्यात येतील असेही महाजन म्हणाले. दुसरीकडे, मोर्चा स्थगित करत आहोत, मात्र सरकारकडे याचा पाठपुरावा करत राहू, दर दोन महिन्यांनी बैठक घेऊ, अशी घोषणा किसान सभेतर्फे जे पी गावित यांनी केली.

माकपचे आमदार जिवा पांडू गावित, किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुर्जर, सुनील मालुसरे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याची तयारी करण्यात येत होती. नेत्यांनी भाषणातून आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर अद्याप वनजमिनी झाल्या नसल्याकडे लक्ष वेधले. वृध्द शेतकऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन, शिधापत्रिकेवर अन्न-धान्य, रखडलेली घरकुल योजना, शेतकरी कर्जमाफी आदी प्रलंबित मुद्दे मांडले.