मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोना विषाणूसंदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी १५ महत्त्वाचे मुद्दे मांडले…

  1. आज जवळपास ८ दिवस होत आले, संपूर्ण देश लॉकडाउन या परिस्थितीत आहे. पण या दिवसांमध्ये मी सर्वांना धन्यवाद देतोय कारण आपण आपल्या संयमाचे अतुलनीय असे दर्शन घडवलेले आहे.
  2. जेव्हा मी आपल्याशी बोलत असतो तेव्हा माझ्यासोबत आपण सगळे जण आहात. माझ्यासोबत आपल्या महाविकास आघाडी सरकारमधील सगळे तिन्ही पक्ष आहेत, त्या पक्षांचे नेते आहेत.
  3. विरोधी पक्षनेत्यांसोबत सुद्धा माझी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे सुद्धा फोन करून सूचना देत आहे.
  4. हे संकट मोठे आहे आणि या संकटाशी लढण्यासाठी आपण एक अकाउंट उघडला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्येच एक वेगळा विभाग केला आहे.
  5. आज सकाळीच मला उदय कोटक यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले “उद्धवजी, आप लढ़ रहे हो, हम आपके साथ है।” आणि त्यांनी १० कोटींची मदत जाहीर केली आहे.
  6. आपण टीव्हीवर बघतो की, ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची काय परिस्थिती आहे, फार वाईट आणि भीषण परिस्थिती आहे. ती दृश्य बघितल्यानंतर आपण काळजी का घेण्याची गरज आहे हे आपल्या लक्षात येईल.
  7. संपूर्ण राज्यात नव्हे, संपूर्ण देशात इतर राज्यांतील कामगार हे त्यांच्या घरी जाण्यासाठी उतावळे झाले आहेत. मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की इतर राज्यातील कामगार जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा. आपली पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे.
  8. साखर कारखान्यांना मी विनंती करतो आहे, आपला जो कर्मचारी वर्ग आहे, कृपा करून आपण आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या.
  9. मी सर्वांना विनंती करतो की आपण संयमाचं अतुलनीय दर्शन घडवत आहेत पण अजूनही काही वस्त्यांमध्ये, विभागांमध्ये वर्दळ होत असेल तर ती वर्दळ ताबडतोब थांबवा. विनाकारण सरकारला कठोर पावले टाकायला लावू नका.
  10. ही आणीबाणी आहे आणि आणीबाणी म्हटल्यानंतर प्रत्येकाने आपापले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून वागलचं पाहिजे आणि ती वागण्याची विनंती मी तुम्हाला करतो.
  11. केंद्र सरकार सुद्धा आपल्यासोबत आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, प्रकाश जावडेकर माझ्याशी बोलत आहेत.
  12. आपली जी आपण जेवणाची केंद्रे उघडली आहेत, ती ठिकठिकाणी उघडली आहेत तिथे आपण मोफत जेवणाची सोय केली आहे. शिवभोजन सुद्धा जे आपण १० रुपयाने देत होतो ते आपण पुढच्या ३ महिन्यासाठी ५ रुपयाने देत आहोत.
  13. डॉक्टर लोकांचा मला अभिमान आहे. अभिमान एवढ्यासाठी की हे भयानक संकट असताना या डॉक्टरांचं मला खरंच कौतुक करावं वाटते. त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने मानाचा मुजरा करतो.
  14. आज रविवार आहे, रविवार सुट्टीचा दिवस आहे. पण ही मंडळी रविवार असो वा नसो, आपल्यासाठी अहोरात्र २४ तास जीवावर उदार होऊन मेहनत करत आहेत. खूप मोठं धोक्याच काम आहे.
  15. आपण आता चाचणी केंद्र आणि टेस्ट करण्याच्या सुविधा वाढवलेल्या आहेत. एक गोष्ट अपेक्षित आहे की करोना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे पण ती अपेक्षेप्रमाणे वाढली पाहिजे, त्याच्या पलीकडे वाढता कामा नये.