केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना चक्कर आल्याची घटना राहुरीमध्ये घडली. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गडकरींना कष्ट कमी करण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत गडकरींनी कष्ट कमी करावेत असं म्हटलं आहे. तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शुभेच्छाही दिल्या आहेत. तुम्ही जास्तीचे काम करता आहात, मात्र त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. गडकरीजी काळजी घ्या असंही शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच ठणठणीत प्रकृतीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अहमदनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ आली. मंचावर उपस्थित असलेल्या राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले. अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के. विद्यासागर राव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली. त्यांच्या बाजूला उभे असलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी तातडीने नितीन गडकरींना सावरले. यानंतर गडकरी यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. यानंतर स्वतः गडकरींनी ट्विट करून प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. आता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही गडकरींना प्रकृती सांभाळण्याचा आणि कष्ट कमी करण्याचा सल्ला दिला आहे.