‘क्राईम पेट्रोल’ बघून कल्पना सुचली

नागपूर : वडिलांकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी मुलाने आपल्या मित्रांसह मिळून स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. त्यानंतर वडिलांना भ्रमणध्वनी करून खंडणी मागितली. पोलिसांच्या योग्य तपासाने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

गौरव प्रदीप दिनकर (२०) रा. वानाडोंगरी, सागर बग्गा आणि राजू हरडे अशी आरोपींची नावे आहेत. गौरवचे वडील प्रदीप रामकृष्ण दिनकर (५१) हे शिक्षक आहेत. गौरव याने विमान कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी एविएशन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्याला दिल्ली येथील मोठय़ा शिक्षण संस्थेत एविएशन अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. त्याकरिता त्याला पैशाची आवश्यकता होती, तर राजू याला कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे गौरवने क्राईम पॅट्रोल बघून मित्रांच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. त्यानंतर मित्रांच्या भ्रमणध्वनीवरून वडिलांशी संपर्क साधून २० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याच्या वडिलाने थेट पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तपास केला असता संबंधित मोबाईल क्रमांकाचे स्थळ वारंवार बदलताना दिसले. शेवटी पोलिसांनी रेल्वेस्थानकावरून गौरवला ताब्यात घेतले. पोलिसांनी मोबाईल क्रमांकांचा अभ्यास केला असता त्यावरून गौरवशीही संपर्क साधण्यात आल्याचे दिसले. त्याची कसून चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी सागर व गौरवला अटक केली, तर राजू हा फरार आहे.

गौरवने क्राईम पॅट्रोल बघून मित्रांच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. मित्रांच्या भ्रमणध्वनीवरून वडिलांशी संपर्क साधून २० लाख रुपयांची खंडणी मागितली.