सोलापूर : लागोपाठ दोन मुली झाल्यानंतर पत्नीवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास विरोध करून मुलगा जन्मावा म्हणून आग्रह केल्याने रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या आईचा निर्घृणपणे खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे घडली. सुरुवातीला हा खून कोणी केला, याचा उलगडा होत नव्हता. परंतु पोलीस तपासात खुनाचे कारण पुढे आले आणि हा खून कोणी दुसऱ्या-तिसऱ्याने नव्हे तर पोटच्या मुलानेच केल्याचे दिसून येताच पोलीसही चक्रावले.

मंगल शहाजी थिटे (वय ५०) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा संतोष शहाजी थिटे (वय ३२) यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात आढळून आले असून त्यास लगेचच अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मृत मंगल हिचा धाकटा मुलगा दत्तू शहाजी थिटे (वय २७) याने दिलेल्या फिर्यादीनुसार मृत मंगल ही बचेरी गावात स्वत:च्या थिटे वस्तीवर रात्री घरासमोरील अंगणात झोपली होती. पती शहाजी यांच्यासह दोन्ही मुले, सुना व नातवंडे असे सारे जण झोपी गेले होते. अंगणात एकटीच झोपलेल्या मंगल हिचा रात्री दहा ते बाराच्या दरम्यान कोणी तरी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने डोक्यात वार करून निर्घृण खून केल्याचे दिसून आले. तशी नोंद पोलिसांनी घेऊन अज्ञात व्यक्तीला आरोपी केले होते. परंतु नंतर झालेल्या तपासात हा खून मंगल हिचा थोरला मुलगा संतोष याने केल्याचे उघडकीस आले. त्याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाल्यानंतर त्यास लगेचच अटक करण्यात आली आहे. आईचा खून स्वत:च्या मुलानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर थिटे कुटुंबीयही हादरून गेले आहे.

बचेरी शिवारात थिटे कुटुंबीयांची २२ एकर जिरायत शेतजमीन आहे. त्यावरच त्यांची उपजीविका चालते. थोरला मुलगा संतोष याचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला असून त्यास दोन मुली आहेत. लागोपाठ दोन मुलीच झाल्यानंतर स्वत:च्या आर्थिक स्थितीचा विचार करता संतोष याने पत्नीची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कुटुंबनियोजनाची एवढी घाई करू नकोस, तिसऱ्यांदा मुलगाच जन्माला येईल. मला नातवाचे तोंड पाहायचे आहे, असा आग्रह धरत आई मंगल हिने सुनेवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यास विरोध केला होता. समजूत घालूनही आई ऐकत नसल्याचे पाहून संतोष हा चिडला होता. त्यातूनच त्याने आईचा खून केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. संतोष यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. माळशिरस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. बी. गोल्डे हे पुढील तपास करीत आहेत.