माणुसकीला लाज वाटावी अशी आणि आई-मुलाच्या नात्यालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मुलाने आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून स्वतःच्या जन्मदात्या आईवर हा मुलगा अत्याचार करत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शहरातील सिडको परिसरात आपल्या दोन मुलांसह राहते. पीडितेच्या पतीचं सात वर्षांपूर्वी निधन झालं असून या महिलेला दोन मुलीही आहेत. दोन्ही मुली बाहेरगावी असतात. या महिलेने चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी करत आपल्या चार अपत्यांना वाढवले. मोठ्या मुलीचं लग्न झालंय आणि दुसरी बाहेरगावी नोकरी करते. तर, आरोपी मुलगा(वय-२०) तिचा सर्वात मोठा मुलगा. त्याला दारू पिण्याचं व्यसन जडलं होतं. शिवाय तो काहीही कामधंदा करत नव्हता.

दारुसाठी पैसे द्यावेत यासाठी हा मुलगा आईला मारहाण करायचा, पैशांसाठी बहीण घरी आल्यावर तिलाही मारहाण आणि शिवीगाळ करीत होता. दारूच्या आहारी गेलेल्या या मुलाने पीडित महिलेवर गेल्या तीन महिन्यांपासून अत्याचार केले. या कृत्याची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून तो पीडितेला जीवे मारण्याची धमकी द्यायचा आणि स्वत:ही आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. भीती आणि बदनामी होईल या विचाराने पीडिता त्याचा अत्याचार सहन करीत होती. पण, मंगळवारी दुपारीही त्याने घरात एकटी असलेल्या आईला मारहाण करीत आणि धमक्या देत अत्याचार केले. अखेर हिंमत एकवटून पीडितेने बुधवारी सकाळी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडितेची तक्रार ऐकून पोलीसदेखील चक्रावले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son rapes his mother shocking incident at aurangabad sas
First published on: 12-12-2019 at 15:18 IST