24 February 2021

News Flash

सोनई ऑनर किलिंग : पाच जणांची फाशी उच्च न्यायालयाकडून कायम

घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडाप्रकरणातील सहापैकी पाच आरोपींची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तर याच प्रकरणातील अशोक नवगिरे या आरोपीची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जानेवारी २०१३ मध्ये सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे ही घटना घडली होती.

विठ्ठलवाडी येथे संदीप राज धनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६), सचिन घारू (वय २३) या दलित मेहतर समाजातील तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. हे तिघे तरुण नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सचिन घारुचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते आणि याच रागातून सहा ते सात जणांनी त्यांची हत्या केली होती.

प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना या प्रकरणात अटक झाली होती.  नाशिकमधील सत्र न्यायालयाने यातील अशोक फलकेला न्यायालयाने दोषमुक्त केले. तर उर्वरित सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले.

नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या खटल्याची सुनावणी होऊन उच्च न्यायालयानं प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले आणि संदीप कुऱ्हे या पाचजणांना फाशीची शिक्षा सुनावली असून अशोक नवगिरे याची पुराव्याअभावी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सोनईतील तिहेरी हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला. घटना घडल्याच्या दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. दलित संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शेवटी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 4:50 pm

Web Title: sonai honor killing case all five convicts get death sentence bmh 90
Next Stories
1 “पंकजा मुंडे यांची ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक आहे, पण..”
2 नक्षलवाद्यांनी केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह पोलीस पाटलाची हत्या
3 चाळीस हजार कोटींच्या निधीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार!
Just Now!
X