सचिन सोहनलाल धारू. हा नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आरोईचा तरुण. दलित. नेवासा फाटा येथील घाडगे पाटील शिक्षण संकुलातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात तो साफसफाईचे काम करीत असे. याच महाविद्यालयात सोनईनजीकच्या विठ्ठलवाडीतील एक मुलगी शिकत होती. ती मराठा. पण त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णयही घेतला होता. याची कुणकुण त्या मुलीच्या नातेवाईकांना लागली. त्याला कारणीभूत ठरला अशोक नवगिरे. तो नवाश्यातल्या खरवंडीचा. दलित समाजातलाच. सुरुवातीला तो त्या मुलीच्या वडिलांकडे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत असे. नंतर या शिक्षणसंस्थेत जेसीबी यंत्रचालक म्हणून कामाला लागला. त्या मुलीच्या घरच्यांना त्यानेच या प्रेमप्रकरणाची माहिती दिली.
यानंतर सचिनला दमदाटी करण्यात आली. मुलीचा नाद सोड म्हणून धमकावण्यात आले. तो ऐकत नाही म्हटल्यावर त्याला मारून टाकण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी विचारपूर्वक कट रचण्यात आला.
त्या मुलींच्या घराजवळच्या शौचालयाच्या टाकीतला मैला उचलून टाकण्याचे काम आहे. त्याचे चार हजार रुपये मिळतील, असे अशोक नवगिरेने सचिनला सांगितले. सचिन कामाला तयार झाला. १ जानेवारी रोजी त्याला विठ्ठलवाडीला बोलावण्यात आले. काम मोठे होते. त्यामुळे सचिनने आपल्यासोबत संदीप थनवार आणि कंडारे यांना बरोबर घेतले. हे दोघेही सचिनचे परिचित. नवीच ओळख होती त्यांची. कंडारे तर अवघ्या तीन दिवसांपूर्वी तेथे कामाला लागला होता.
हे तिघे विठ्ठलवाडीला आल्यानंतर त्या मुलीचे वडील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, तसेच प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले, संदीप माधव कुऱ्हे, अशोक सुधाकर नवगिरे यांनी सचिनला घेरले. त्याला मुलीचा नाद सोड म्हणून बजावले.
त्या वेळी सचिनने आम्ही लग्न करणार आहोत असे सांगितले. ते ऐकल्यानंतर आरोपींनी सचिनला आणि त्याच्या सोबत आलेल्या त्या दोघांनाही मारून टाकले. अतिशय क्रूरपणे त्यांनी सचिन आणि कंडारेच्या खांडोळ्या केल्या. कडबा कापण्याच्या अडकित्त्याने त्यांचे मुंडके, हातपाय तोडण्यात आले. संदीप हा सुमारे सहा फूट उंचीचा. त्याला शौचालयाच्या टाकीत बुडवून मारण्यात आले. यानंतर, दोघांचे खून करून संदीपने आत्महत्या केली, असा बनाव पोपट दरंदले याने केला. सोनई पोलीस ठाण्यात जाऊन त्याने अशीच बतावणी केली, पण हा बनाव तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी उघड केला. आज आरोपींना जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यात पाटील यांनी केलेल्या तपासाला विशेष महत्त्व आहे. नंतर तपास पोलीस उपअधीक्षक अविनाश गांगुर्डे यांच्याकडे, तर पुढे सीआयडीचे पोलीस उपाधीक्षक एस. डी. बांगर यांच्याकडे गेला. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रऊफ शेख, हवालदार रमेश कालंगडे, संपत गवते, किरण अरकल, उत्तरेश्वर मोराळे यांनी त्यांना मदत केली. राज्याला हादरा देणाऱ्या या क्रूर गुन्ह्य़ाचा तपास ६० दिवसांत करून, त्यांनी ९० दिवसांत ९५० पानांचे आरोपपत्र दाखल केले. प्रशासनातील अधिकारी हे सर्व समाजातील होते. आरोपी सवर्ण होते. जातीपेक्षा वर्दी महत्त्वाची मानून पोलिसांनी काम केल्याने साक्षीदार नसूनही खटल्यात गुन्हेगारांना शिक्षा झाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2018 3:17 am