नगर जिल्ह्य़ातील सोनई (तालुका नेवासे) येथे गेल्या वर्षी जानेवारीत घडलेल्या तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणाची सुनावणी नेवासे  सत्र न्यायालयाऐवजी नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. एम. देशपांडे यांनी दिला.
गणेशवाडी (नेवासे फाटा) येथील घाडगे पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलीचे दलित समाजातील मुलावर प्रेम होते. या प्रकरणातून गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आरोपीने अमानुषपणे तीन दलित युवकांची हत्या केली होती. या प्रकरणाची सुनावणी नेवासे सत्र न्यायालयात सुरू होती. यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. सुनावणीदरम्यान दोन समाजांत तणाव निर्माण होऊन साक्षीपुराव्याच्या वेळी दबाव येऊ शकतो, त्यामुळे ही सुनावणी नाशिक किंवा जळगाव येथे घेण्यात यावी, अशी विनंती मृताचा नातेवाईक पंकज राजू तनवार यांनी अॅड. अनिल गायकवाड यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात केली होती. सुनावणीअंती याचिकाकर्त्यांचे म्हणणे ग्राह्य़ धरून हा खटला नेवासे सत्र न्यायालयाकडून वर्ग करून नाशिक येथे घेण्याचे आदेश देण्यात आले. सरकारतर्फे अॅड. व्ही. डी. गोडभरले यांनी बाजू मांडली.