अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी नाशिकमधील जिल्हा सत्रन्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. शिक्षेबाबत न्यायालय २० जानेवारी रोजी निर्णय देणार आहे.

पाच वर्षांपूर्वी राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनईतील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी सोमवारी नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने सहा जणांना दोषी ठरवले होते. तर एकाची पुराव्याअभावी मुक्तता केली होती. दोषींच्या शिक्षेबाबत गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. गुरुवारी न्यायालयात जवळपास अर्धा तास युक्तिवाद झाला. बचाव पक्षातर्फे तीन पैकी दोन वकिलच न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते. सर्व दोषींच्या वतीने दोन्ही वकिलांनी बाजू मांडली.

दोषींमध्ये तीन जण तरुण आहेत. तर दोन जण वयोवृद्ध आहेत. याचा विचार करुन त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयात केली. बचावपक्षाच्या युक्तिवादानंतर सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. इंदिरा गांधी खटल्याचा दाखलाही त्यांनी युक्तिवादादरम्यान दिला. निकम यांनी युक्तिवादात १२ ते १३ मुद्दे मांडले. सर्वांनी कट रचला आणि तिघांची हत्या केली. या कटात सहभागी असलेल्या सर्वांना समान म्हणजेच फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने २० जानेवारी रोजी शिक्षेसंदर्भात निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले.

सोनईतील सचिन धारू (२४) या तरुणाचे पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदलेच्या (४८) मुलीशी प्रेमसंबंध होते. ते विवाह करणार असल्याचे समजल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी सचिनच्या हत्येचा कट रचला. शौचालयाच्या टाकीची सफाई करण्याच्या बहाण्याने त्यांनी सचिनसह संदीप थनवार, सागर उर्फ तिलक कंडारे यांना दरंदले वस्तीवर बोलावले. तिथे त्या तिघांची अत्यंत अमानूषपणे हत्या करण्यात आली. हत्या करणारे ऊस बागायतदार होते. हत्या झालेले मेहतर समाजातील सफाई कामगार होते. या हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. सोमवारी न्यायालयाने याप्रकरणात पोपट उर्फ रघूनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश उर्फ प्रवीण दरंदले, संदीप कुल्हे, अशोक नवगिरेला दोषी ठरवले होते.