दारूच्या आहारी गेलेल्या मुलाचा पैशासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून निर्घृण खून केल्याची कबुली प्राध्यापकाने दिली. त्याच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली, तर इतर दोघे फरारी आहेत.
देवेंद्र सोळुंके असे या प्राध्यापकाचे नाव असून शहरातील एका महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख म्हणून तो कार्यरत होता. दारूच्या आहारी गेलेला मुलगा पैशासाठी सारखा त्रास देत असल्याने त्याचा कायमचा काटा काढल्याचे सोळुंके याने पोलिसांना सांगितले. रविवारी (दि. २३) सकाळी सहाच्या सुमारास सारोळा परिसरातील शिवारात २५ वर्षीय तरुणाचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सोळुंके याचा मुलगा पराग याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पराग हा देवेंद्र सोळुंके याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा असून तो विभक्त राहात होता. कोणताही कामधंदा न करणाऱ्या व सतत दारूच्या नशेत राहणाऱ्या परागपासून वडिलांना पशाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे त्याला कायमचा संपवण्याचा कट रचल्याची कबुली सोळुंकेने पोलिसांना दिली. खुनाचा कट पूर्णत्वास नेण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतील अॅसिड घरी आणून ठेवले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास सोळुंके याने गल्लीतील बबन चंद्रकांत कुंभार (वय २४), दत्ता दादाराव केसगिरे, मेहुणे ज्ञानेश्वर साखरे (वय ३०) व नागेश साखरे (वय २२) यांच्या मदतीने परागचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा चेहरा ओळखू येऊ नये, यासाठी अॅसिड टाकून मृतदेह सारोळा शिवारात टाकून दिला. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सोळुंके, तसेच त्याच्या लातुरातील दोघा साथीदारांना अटक केली. उर्वरित दोन साथीदार फरारी आहेत.
कल्पना गिरी यांचा मृत्यू; तपासाची गती वाढविली
वार्ताहर, लातूर
युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कल्पना गिरी यांचा मृतदेह तुळजापूर नजीकच्या तलावात आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची गती वाढविली असून, लवकरच धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
गेल्या २१ मार्चला रंगपंचमीच्या दिवशी आमदार अमित देशमुख यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना जात असल्याचे सांगून गिरी घराबाहेर पडल्या. रात्री परत न आल्याने पालकांनी पोलिसात तक्रार दिली. २३ मार्चला तुळजापूरजवळील तलावात त्यांचा मृतदेह आढळला. २४ मार्चला पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लातुरातून त्या तुळजापूरला कशा गेल्या?, त्यांच्यासोबत कोण होते?, तलावाजवळ त्या गेल्या की नेण्यात आले?, त्यांना तलावात ढकलले की त्यांनी उडी घेतली? याबाबत तपासाची दिशा केंद्रित केली जात आहे. तुळजापूर टोलनाक्याजवळील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. घात की अपघात? ही शक्यताही तपासली जाईल व संबंधितांना लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.