सध्या देशात करोनानं थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा कलाकार सोनू सूद हा सर्वांनाच मदतीचा हात देत असल्याचं आपल्याला दिसत आहे. अशातच सोनू सूदनं महाराष्ट्र पोलिसांसाठी तब्बल २५ हजार फेस शिल्ड दिल्या आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसंच त्यांनी सोनू सूदचे आभारही मानले आहेत.

अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सोनू सूद आणि त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. “आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार फेस शिल्ड दिल्याबद्दल सोनू सूद यांचे आभार,” असं कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिलं आहे. सोनू सूदच्या या कार्यांबद्दल अनेकांकडून त्याची स्तुतीही करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही अनेक युझर्सनं त्याचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे सोनू सूदनंही तो फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. “आपले पोलीस बांधव आणि भगिनी हे खरे हिरो आहेत. ते करत असलेल्या कार्यासमोर हे फारच कमी आहे,” असं तो म्हणाले.

यापूर्वी सोनू सूदनं प्रवासी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली होती. आतापर्यंत त्यानं हजारो प्रवासी मजुरांना सुखरूप त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं आहे. सुरूवातीला त्यानं बसेसमधून मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडलं होतं. त्यानंतर त्यानं अनेकांना रेल्वेगाड्या आणि विमानांद्वारेही घरापर्यंत पोहोचवलं, तसंच काही महिन्यांपूर्वी त्यानं एक टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सअॅप क्रमांकही जारी केला होता. नुकताच त्यानं प्रवासी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यादरम्यान आलेल्या अनुभवांवर एक पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.