सुपा औद्योगिक वसाहतीसाठीच्या भूसंपादनाचा अंतिम दर उद्योग सचिवांशी चर्चा करून निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी उद्योग सचिवांनी जागेचीही पाहणी केली आहे. लवकरच हा दर जाहीर करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उद्योजकांशी झालेल्या चर्चेच्या वेळी आज दिली.
लोकसभा निवडणूक निकालानंतर थोरात आज प्रथमच नगरमध्ये आले होते. विविध मागण्यांसाठी शहरातील शिष्टमंडळांनी त्यांना निवेदने देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात भेटी घेतल्या. आ. डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे, जि.प. सदस्य सत्यजित तांबे, शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा, सरचिटणीस अनंत देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंटस्ट्रिजचे (आमी) अध्यक्ष अशोक सोनवणे, दौलत शिंदे, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र कटारिया, दिलीप अकोलकर, विजय जुंदरे आदी उद्योजकांनी थोरात यांची भेट घेऊन मागण्यांचे निवदन दिले. जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक गेल्या ८ महिन्यांत झाली नसल्याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
जिल्हा पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्याची सूचना थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. राज्य पातळीवरील प्रश्नांसाठी आपण उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊ, असेही त्यांनी आश्वासन दिले.
नगर बक्कर कसाब जमात संघटनेचे मीराबक्ष अल्लाबक्ष, शौकत अली, शब्बीर युसूफभाई, गफ्फार कादरभाई यांच्या शिष्टमंडळाने समाजास इतर मागासवर्गीयांचे दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच शहरात अधुनिक कत्तलखाना उभारणीचे निवेदन दिले. त्यावर दि. ३ जूनपूर्वी बैठक आयोजित केली जाईल, असे थोरात यांनी सांगितले. यतिमखान्याच्या प्रश्नावरही त्याच वेळी बैठक होणार आहे.
वाडिया पार्कचे शिष्टमंडळ भेटले
वाडिया पार्कमधील गाळेधारकांनीही महसूलमंत्री थोरात यांची भेट घेतली व आरक्षण बदलण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले. आता केवळ महापालिकेने बांधकाम परवाना दिल्यास गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले. त्याबाबत मनपा आयुक्तांना सूचना देण्याचे थोरात यांनी मान्य केले. उच्च न्यायालयानेही मनपा वकिलांना याबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत विचारणा केली होती, परंतु वकिलांनी आचारसंहितेमुळे सध्या निर्णय होऊ शकत नसल्याचे दि. २८ एप्रिलच्या सुनावणीत सांगितले होते. आता १२ जून रोजी सुनावणी होणार आहे.