प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नगरकरांचे नाटय़गृहाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांच्या हस्ते येत्या रविवारी महानगरपालिकेच्या नियोजित नाटय़गृहाचे भूमिपूजन होणार आहे.
सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील क्रीडा संकुलाच्या जागेवर मनपा अत्याधुनिक नाटय़गृह बांधणार आहे. त्यासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, विविध निधीतून ही रक्कम उभी करण्यात येणार आहे.
शहरातील रंगकर्मीच नव्हेतर आम नगरकर गेली पंधरा-वीस वर्षे नव्या नाटय़गृहाच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी शहरात अनेकदा आंदोलने झाली. मात्र विविध कारणांनी त्याला मुहूर्तच मिळत नव्हता. शहरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकमेव नाटय़गृह आहे. गेली सुमारे ४० वर्षे त्यावरच नगरकर नाटक व तत्सम सांस्कृतिक भूक भागवतात. अलीकडेच सावेडीत तलाठी संघाचे माउली नाटय़गृह झाले, त्यानेही चांगली सोय झाली आहे. मात्र महानगरपालिकेचे नाटय़गृह लाल फितीत अडकले होते. त्याला आता मुहूर्त लागला आहे.
महापौर अभिषेक कळमकर यांनी महिनाभरापूर्वी सूत्रे स्वीकारल्यानंतर या प्रकल्पाचे येत्या रविवारी वळसे यांच्या हस्ते या नाटय़गृहाचे भूमिपूजन होणार आहे. जिल्हय़ाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, खासदार दिलीप गांधी, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार शरद रणपिसे, अंकुश काकडे, दादा कळमकर, डॉ. सुजय विखे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवारी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कळमकर व उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केले आहे.