शहरातील पैठणगेटला काँग्रेसचे कार्यकर्ते जमू लागले. तिरंगी टोप्यांवर हाताचे चिन्ह, गळ्यात सोनिया व राहुल गांधी यांचे छबी असणारे रुमाल. समोर ढोलताशे. मोठय़ा थाटात व शिवसेनेला खुन्नस म्हणून काँग्रेस उमेदवार नितीन पाटील यांनी गर्दी जमविली. अर्ज दाखल केला आणि संदेश दिला, ‘छत्रपतीं’चा विजय असो! अर्ज दाखल केल्यानंतर गांधी भवन येथे झालेल्या सभेत बहुतांश नेत्यांनी ‘मराठय़ां’चे सळसळणारे रक्त आणि शिवाजी महाराजांचा इतिहास नव्याने निवडणुकीच्या अंगाने मांडला. लोकसभेची ही निवडणूक जातीच्या अंगाने पुढे नेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होईल, असे संकेत या वेळी देण्यात आले.
कार्यकर्ते जमण्यापूर्वी पैठणगेटच्या मोबाईल दुकानांसमोर नेत्यांनी खुच्र्या टाकल्या. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार अब्दुल सत्तार, एम. एम. शेख, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, विक्रम काळे आदी नेतेमंडळी बसली. नेत्यांभोवती कार्यकर्ते गोळा झाले. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या गटाला नेत्यांबरोबर छायाचित्र काढून घ्यायचे होते. शहरातून व मतदारसंघांतून आलेल्या प्रत्येकाला ‘तिरंगी’ टोपी दिली जायची. तरुण कार्यकर्ते ढोल-ताशांच्या भोवती पिंगा घालायचे. फटाके वाजले आणि उमेदवारासह प्रचारफेरी पुढे चालली. लक्षात आले की, लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायचा राहिला. एक मोठा हार आणला गेला, पण तो घालायचा कसा, असा प्रश्न बराच वेळ होता. एकजण चबुतऱ्यावर चढला. त्याने उमेदवाराला सांगितले, तुम्हीदेखील वर या. चबुतरा एवढा उंच होता की, वर चढता चढता नितीन पाटील जवळजवळ लटकलेच होते. पुष्पहार घातल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयी भाव होते. उघडय़ा जीपवर ‘आघाडी’चे नेते चढले. मंत्री दर्डा कधी चालत, तर कधी गाडीसमोरच्या भागावर बसत. कार्यकर्ते त्यांना हार घालत.
मिरवणुकीत महिलांची संख्याही मोठी होती. ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जीपने आणल्याचे सांगण्यात आले. ‘जेवण-खावण त्यांच्याकडे, बाकी गावाकडे गेल्यावर बघू,’ असे एकीने सांगितले, तर दुसरी महिला म्हणाली, ‘आमच्या गावातील प्राध्यापकाने मिरवणुकीत जा,’ असे सांगितले म्हणून आले. अशा बऱ्याच जणी. बहुतांशजणी कन्नड तालुक्यातून आलेल्या. काही शहरातील.
वाट काढत मिरवणूक गुलमंडीवर पोहोचली. कार्यकर्त्यांना शरबत देण्यात आले. मछलीखडकहून मिरवणूक नेण्यात आली. येथे खासदार खैरे यांचे निवासस्थान असल्याने ढोलताशावाल्यांनीही सगळा जोर लावला. तसे खुन्नस म्हणता येईल, असे वातावरण. पुढे प्रचारफेरी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली. काही कार्यकर्ते गांधी भवनाकडे गेले. दरम्यान, उमेदवारी अर्जही दाखल करून झाला. प्रचारफेरीनंतर गांधीभवनाजवळ उभारलेल्या शामियान्यात काँग्रेस व आघाडीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची भाषणे झाली. या भाषणाच्या वेळी मात्र दर्डा दिसले नाहीत.
व्यासपीठावर बसलेल्या बहुतेकांनी काँग्रेसचे निर्णय देशासाठी कसे उपयोगाचे, हे सांगितले. पण वैजापूरच्या भाऊसाहेब चिकटगावकरांनी निवडणुकीत कसा प्रचार असेल, याचे संकेत दिले. ते म्हणाले की, मतांसाठी सेनेवाले छत्रपतींना वापरतात. शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करतात. अनेकदा ग्रामीण भागात लोक म्हणायचे, एकदा तरी आपला माणूस उमेदवार म्हणून द्या. आता ‘छत्रपती’स निवडणुकीत उभे केले आहे. या पुढे म्हणा, ‘छत्रपती नितीन पाटील की जय.’ शिवाजी महाराजांवरील इतिहासाचा दाखला आमदार शेख यांनी आवर्जून दिला. शिवाजी महाराज कधीही मुस्लिमविरोधी नव्हते. त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते, असे शेख म्हणाले.