राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांची उमेदवारी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने आजवरच्या वेगवेगळ्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. पक्षांतर्गत विरोधकांनी मोठय़ा प्रमाणावर कारवाया केल्यानंतरही भांबळे यांची उमेदवारी निश्चित होण्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जबर इच्छाच कारणीभूत असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.
भांबळे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असले तरीही अद्याप त्यांनी घडय़ाळाच्या चिन्हावर कोणतीही निवडणूक लढवली नाही. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भांबळे बहुजन समाज पक्षाचे जिंतूर मतदारसंघाचे उमेदवार होते. तर २००९ मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी जिंतूरमधूनच निवडणूक लढवली होती. आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडून ते पराभूत झाले होते. असे असले तरी राष्ट्रवादीने मात्र भांबळे यांच्या बाजूने सुरुवातीपासूनच आपली ताकद उभी केली होती. विशेषत: उपमुख्यमंत्री पवार यांचे खंदे समर्थक म्हणून भांबळे गणले जातात. जिंतूर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही भांबळे यांना पक्षाने अल्पावधीतच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचा गट नाराज झाला, ती नाराजी अजूनही कायम आहे.
दरम्यानच्या काळात वरपुडकरांना शह देण्यासाठी राज्यमंत्री फौजिया खान-विजय भांबळे असेही समीकरण अस्तित्वात आले. ते पक्षाच्या ‘प्रासंगिक करारा’त टिकले नाही. श्रीमती खान यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी काढून घ्यावी, यासाठी पुढच्याच अंकात भांबळे, वरपुडकर यांचे सख्य झाले. पुन्हा आमदार बाबाजानी आणि भांबळे यांची गट्टी झाल्यानंतर वरपुडकर दूर झाले. गेल्या वर्षभरापासून भांबळे यांचे नाव लोकसभेसाठी अग्रक्रमाने घेतले जात असताना वरपुडकर गटाने त्यांच्या नावाला पक्षांतर्गत चौकटीत जोरदार विरोध केला. वरपुडकर समर्थकांची बठकही भांबळेना उमेदवारी नको, अशी भूमिका घेत पार पडली होती. या ना त्या कारणाने भांबळेंची उमेदवारी घोषित होऊ नये, यासाठी वरपुडकरांनी आटोकाट प्रयत्न चालवले होते.
पहिल्या टप्प्यात राज्यमंत्री श्रीमती खान यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी वरपुडकरांनी सुरू केली. या नावावर कोणताच सकारात्मक प्रतिसाद न आल्याने वरपुडकरांनी पुन्हा विद्यमान खासदार गणेश दुधगावकर यांनाच राष्ट्रवादीत घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी, अशी भूमिका पक्षाकडे मांडली. दुधगावकर यांना उमेदवारी दिली तर आम्ही काँग्रेसच्या मदतीने निवडून आणू, असा शब्द वरपुडकरांनी थोरल्या पवारांकडेही टाकला. मात्र उपमुख्यमंत्री पवार हे भांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिल्याने पहिल्याच यादीत त्यांची उमेदवारी घोषित झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळी नावे चच्रेत आणून भांबळे यांच्या नावाला विरोध करण्याचे वरपुडकरांचे प्रयत्न वेगवेगळ्या स्तरावरून चालूच होते. या प्रयत्नांना आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीने पहिल्याच यादीत भांबळे यांचे नाव घोषित करून परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबतची संदिग्धता घालवून टाकली आहे.

mahayuti in campaign, Mahavikas Aghadi,
महायुतीतील दिग्गज प्रचारात, तर महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार
Ajit Pawar, sunetra pawar
दुभंगलेली मने जोडण्यावर अजित पवारांचा भर
Prithviraj Chauhan
भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला? पृथ्वीराज चव्हाण यांना लढण्यासाठी आग्रह
In the first list of candidates announced by Sharad Pawar faction of NCP Nilesh Lanke from Nagar Lok Sabha Constituency has been included
शरद पवार-नीलेश लंके यांनी ठरवून केलेली खेळी की निव्वळ योग? राजीनामा आणि लगेचच उमेदवारीच्या पहिल्याच यादीत स्थान