मराठवाडय़ातील प्रमुख १४ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ५.६९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. काही जिल्हय़ांत पावसाच्या सरी येऊन गेल्या असल्या तरी पाऊस तसा मोठा नव्हता. अनेक जिल्हय़ांत पावसाने अजूनही पाठ फिरवलेलीच आहे. त्यामुळे पेरण्या रखडलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला पाणीसाठय़ात दिवसेंदिवस घट होते आहे. जायकवाडीसारख्या मोठय़ा धरणातदेखील केवळ ४.८७ टक्के पाणीसाठा आहे. येत्या काही दिवसांत मोठा पाऊस झाला नाही तर अडचणी वाढतील, असे वातावरण आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांतून ‘ये रे घना’ची साद घातली जात आहे.
मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्याची टंचाई नेहमीचीच झाली आहे. ५००हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जायकवाडी जलाशयात १०५.६८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ४.८७ टक्के एवढी आहे. उपयुक्त पाणीसाठा साधारणत: ४५ दिवस औरंगाबाद शहराला पिण्यासाठी पुरेल, असे सांगितले जाते. निम्नतेरणा आणि मांजरा ही दोन धरणे या वर्षी कोरडीच राहिली. निम्नदुधना, मनार, येलदरी येथे २० टक्क्यांहून पाणीसाठा आहे. विष्णुपुरीमध्ये १४.४१ टक्के पाणीसाठा आहे. दिवसेंदिवस बाष्पीभवनाचा वेगही वाढू लागलेला आहे. पावसाचा मात्र अजून पत्ताच नाही, असे वातावरण आहे. कधीतरी एखाददुसरी मोठी सर येऊन जाते. पेरणीसाठी मोठय़ा पावसाची नितांत आवश्यकता आहे.