16 January 2021

News Flash

सोयाबीन उत्पादक चिंतेत

एकूण क्षेत्राच्या ८० टक्के पेरा फक्त सोयाबीनचा असून महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन पेरा करणारा जिल्हा म्हणून लातूरची नोंद आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रदीप नणंदकर

लातूर जिल्ह्य़ात खरीप हंगामात ११ लाख एकरवर सोयाबीनचा पेरा झाला. सुमारे ९० लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन गृहीत धरले व सरासरी साडेतीन हजार रुपये भाव धरला तरीही जिल्ह्य़ात तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल या वर्षी होईल असा अंदाज आहे. पण खर्च आणि उत्पादन यातील तफावत अधिक असल्याने सोयाबीन उत्पादक चिंतेतच आहेत.

खरीप हंगामातील मूग व उडीद पिकाचा पेरा मृग नक्षत्रात झाला तरच हे पीक येते व पाऊस लांबला तर पीक हातचे जाते. तुलनेने सोयाबीनचा पेरा थोडाबहुत लांबला तरी चालतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा सोयाबीनच्या पेऱ्याकडे आहे. एकूण क्षेत्राच्या ८० टक्के पेरा फक्त सोयाबीनचा असून महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन पेरा करणारा जिल्हा म्हणून लातूरची नोंद आहे.

यांत्रिकीकरणाकडे भर देणे सुरू असल्याने ट्रॅक्टरवरून पेरणी होते. त्यामुळे कमी कालावधीत पेरणी झाल्यामुळे एकाच वेळी काढणीचा हंगाम येतो. काढणीसाठी मोठय़ा प्रमाणावर मजूर लागत असल्याने शेतकरी मजुरांकडून नाडला जातो आहे. सोयाबीनच्या ३० किलोच्या एका पिशवीच्या काढणीला सरासरी चार हजार रुपये मजुरांना द्यावे लागतात. त्यानंतर मळणी करण्यासाठी व रास करण्यासाठी एका पिशवीला सुमारे अडीच हजार रुपयांच्या आसपास खर्च येतो. शिवाय पेरणी, बी-बियाणे, खत, कोळपणी, खुरपणी,  विविध फवारण्या यासाठीचा भांडवली खर्च काढला तर उत्पन्नाच्या २५ टक्केही पैसे शिल्लक राहत नाहीत.

खर्च अधिक

या वर्षी काढणीच्या हंगामात एका महिनाभरात ३०० कोटी रुपये मजुरीवर शेतकऱ्याला खर्च करावे लागले व काढलेल्या सोयाबीनचे रास करून ते घरी आणण्यासाठीचा खर्च २०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. काढणीसाठीचा एवढा मोठा खर्च खरीप व रब्बी हंगामातील कोणत्याही पिकाला लागत नाही. हा खर्च कमी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने काढणीची प्रक्रिया करायची म्हटली तर यासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध नाही. कै. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणीच्या वतीने १६२ वाण विकसित केले आहेत. मात्र, याचे उत्पादन अन्य वाणापेक्षा १५ टक्यांनी कमी येते. मात्र, याचा काढणीचा खर्च साडेसहा हजार रुपयांऐवजी अडीच हजार रुपयेच लागतो. या वाणाचे उत्पादन वाढवण्याचा विद्याापीठ प्रयत्न करत असल्याचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्य़ातील रेणापूर येथील पंडित माने हे सोयाबीनचे मोठे उत्पादक आहेत. वर्षांनुवर्षे सोयाबीनचा पेरा करूनही हा धंदा आतबट्टय़ाचाच होत असल्याचे ते म्हणाले. सोयाबीन काढणीनंतर योग्य भाव मिळत नाही व या पिकाला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे हे पीक नाइलाजाने घ्यावे लागत असल्याचे ते म्हणाले. साकोळ येथील प्रगतशील शेतकरी माधवराव बर्गे हे सेंद्रीय पद्धतीने शेती करतात. एमएस-११८८ हे वाण बारामतीजवळील एका गावात इंग्लंड येथील संशोधक डॉ. थिलिप्स यांनी विकसित केले असून बर्गे यांनी हे वाण तेथून आणले आहे. याची काढणी यंत्राने करता येते व एकरी केवळ अडीच हजार रुपये खर्च येतो व उत्पादनही दीडपट आहे. या पद्धतीने शेतीत बदल करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2020 12:14 am

Web Title: soybean growers worried abn 97
Next Stories
1 जव्हारचा हुंबरणे पाडा ‘वाळीत’
2 लहरी हवामानामुळे सुक्या मासळीचे नुकसान
3 रायगडमध्ये ९० टक्के रुग्ण करोनामुक्त
Just Now!
X