केंद्र सरकारने तेल आयातीवर लादलेले निबर्ंध आणि वाढवलेल्या आयातकराचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. गेल्या चार वर्षांनंतर सोयाबीनला चांगला भाव मिळत असून बाजारपेठेत एकप्रकारे सोयाबीनच्या दरात तेजी आलेली आहे. सोयाबीनचा भाव येत्या काही दिवसात पाच हजार रुपयांचाही टप्पा ओलांडेल, असे संकेत मिळत आहेत. बाजारपेठेत त्यामुळे एकप्रकारचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

सध्या बाजारपेठेत सोयाबीनचा भाव सौद्यात ४३०० रुपये तर पोटलीत ४२०० च्या आसपास आहे. सोयाबीनचा हमीभाव ३७१० रुपये जाहीर झाला आहे. हमीभावापेक्षा चढय़ा भावाने बाजारपेठेत सोयाबीन विकले जात आहे. राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या तिन्ही प्रांतात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. देशांतर्गत सोयाबीनचे उत्पादन ८० ते ८२ लाख टनच्या आसपास होईल असा अंदाज व्यक्त होतो आहे.

उत्पादन घटीचा परिणाम सोयाबीनचा भाव वाढण्यावर होतो आहे. सोयाबीनचे भाव व पामतेलाचे दर यांचाही संबंध असतो. यावषीं पामतेलाचे भावही बाजारपेठेत वाढत आहेत. तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आयातकर वाढवला जात असल्याने त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर होतो आहे. गेल्या चार वर्षांनंतर सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने बाजारपेठेत वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.

लातूरच्या कीर्ती उद्योग समूहाने २० जानेवारी २०२० रोजी ४६५० रुपये, २० फेब्रुवारी ४७०० रुपये, २० मार्च रोजी ४७५० रुपये असे खरेदीचे भाव जाहीर केले आहेत. चांगल्या गुणवत्तेचे सोयाबीन बाजारपेठेत कमी येत असल्याने पुढील वर्षी सोयाबीन बियाणांचे भावही चांगलेच वाढतील, असा अंदाज कीर्ती समूहाचे प्रमुख अशोक भुतडा यांनी व्यक्त केला आहे.

’ बहुराष्ट्रीय कंपन्या बाजारपेठेतील चांगले सोयाबीन बियाणांसाठी खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या कंपन्यांनी घेतलेले सीड प्लॉट अतिवृष्टीत अडचणीत आल्याने बाजारपेठेतील सोयाबीन खरेदी करण्याकडे कंपन्यांचा कल आहे. पुढील वर्षीच्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पुरेसे सोयाबीन उपलब्ध होणे अडचणीचे होणार असल्याने बियाणांचे भावही गगनाला भिडणार आहेत. एप्रिल व मे महिन्यात सोयाबीनचा भाव पाच हजार रुपयांपेक्षा अधिक होईल, असा अंदाज बाजारपेठेतील तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.