प्रशांत देशमुख 

आगामी खरीप हंगामावर बियाणे तुटवडय़ाचे सावट असून त्यामुळे गतवर्षीच्या हंगामातील सोयाबिन बियाण्यांची तजवीज करून ठेवण्याची वेळ  शेतकऱ्यांवर आली आहे.

राज्यात सोयाबिन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३४ हेक्टर इतके असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पेरणीक्षेत्रात वाढ होणार असल्याने वाढीव बियाण्यांची गरज भासणार आहे. २०१९च्या हंगामात  पाऊस  लांबला. तसेच सोयाबिन काढण्याच्या कालावधीत अवेळी पाऊस झाल्यामुळे यावर्षीच्या बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरित परिणाम झाला.  राज्यातील शेतकऱ्यांनी मागील हंगामात प्रमाणित बियाण्यांची पेरणी करून खास बियाण्यांचे पीक घेतले होते. आता हे दोन्ही प्रकारचे बियाणे पुढील खरीप हंगामासाठी साठा करून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांनी यास दुजोरा देत वाढीव पीकक्षेत्रासाठी लागणाऱ्या बियाण्यांची गरज मागील हंगामात पेरणी झालेल्या बियाण्यांवरच भागविणे गरजेचे असल्याचे सांगितले. २०२० च्या खरीप हंगामासाठी सोयाबिन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यानेच अशी पूर्व खबरदारी घेण्याची भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.

सोयाबिनला स्वपरागसिंचित पीक म्हटले जाते. राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळवाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची गरज नसल्याचेही सांगितले जाते. गत दोन वर्षांत पेरलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबिनदेखील बियाणे म्हणून वापरता येते. त्यामुळे उत्पादनखर्च कमी होतो. त्यासाठी चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करून निवड करावी लागते. साठवण करण्यापूर्वी बियाणे तीन दिवस उन्हात वाळवून त्यातील आर्द्रता नऊ ते बारा टक्क्यापर्यत आणण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे. साठवणूक करायची असल्याने बियाण्यांची घरगुती पद्धतीने उगवणशक्ती तपासावी व त्यातून ७० टक्के सक्षम बियाण्यांच्या साठवणीची काळजी घेणे अपेक्षित आहे. हे बियाणे हवेतील आद्र्रता लवकर शोषत असल्याने थंड परिसरातच साठवणूक करावी. प्लास्टिकचे पोते टाळावे. आठ पोत्यांपेक्षा जास्त मोठी राशी नसावी. अन्यथा बियाणे फुटण्याचा धोका संभवतो. पोत्यांची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने केल्यास उगवणशक्ती जास्तकाळ टिकते. सोबतच साठवण असलेल्या खोलीत किटक व बुरशीनाशकाचा वापर टाळावा, अशी सूचनाही कृषी विभागाने केली आहे.