पीपीई किट घालून रुग्णसेवा बजावणे अतिशय अवघड काम आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सलग पाच- सहा तास किट घालून करोनाबाधित रुग्णावर उपचार करीत आहेत. या डॉक्टरांचे योगदान अमूल्य असल्याचे मत सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले. स्वतः पीपीई किट घालून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि उपचारांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

वाई पोलीस ठाण्यातील पंधरा पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ताबडतोबीने वाईला भेट दिली. उपचार सुरु असणाऱ्या संचित आयसीयू बी विंग रुग्णालयात जाऊन करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली. यातील काही कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही करोनाबाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे कर्मचारी चिंता व्यक्त करीत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा देताना सातपुते म्हणाल्या, “तुम्ही लवकरच ठणठणीत व्हाल तसेच तुमच्या कुटुंबीयांसमवेत आम्ही आहोत त्यामुळे काळजी करू नका.”

आणखी वाचा- आता सरपंच करतील ऑनलाईन शिक्षणासाठी जिल्हा प्रशासनाला मदत, चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव प्रयोग

या अनुभवातून त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी करीत असलेली रुग्णसेवा ही निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी करीत असलेली रुग्णसेवा ही निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे, असेही त्या वेळी म्हणाल्या.