सांगली जिल्ह्यातील रविवारी झालेल्या सभापती निवडीत १० पैकी ६ पंचायत समितीत राष्ट्रवादीने आणि ३ मध्ये काँग्रेसने बाजी मारली. शिराळा पंचायत समितीत दोन्ही काँग्रेसची आघाडी असून या ठिकाणी आघाडीचे सभापती झाले. तांत्रिक दृष्टय़ा राष्ट्रवादीकडे असणाऱ्या खानापूर व जत येथील पंचायत समित्या महायुतीच्या वर्चस्वाखाली गेल्या आहेत.
    तांत्रिक दृष्टय़ा खानापुरात राष्ट्रवादीची सत्ता असली तरी नूतन पदाधिकारी अनिल बाबर समर्थक असल्याने येथील सत्ता शिवसेनेकडे आणि जतची सत्ता भाजपाच्या वाटेवर असणाऱ्या विलासराव जगतापांकडे गेली आहे.
    मिरज, पलूस, कडेगाव या तीन पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी निवडून आले आहेत. मिरज येथे दिलीप बुरसे सभापती आणि तृप्ती पाटील उपसभापती झाले. पलूस येथे विजय कांबळे, रंजना पवार आणि कडेगाव येथे लता महाडिक, विठ्ठल मुळीक हे सभापती व उपसभापती झाले.
    राष्ट्रवादीकडे असणाऱ्या वाळवा पंचायत समितीत रवींद्र बर्डे आणि भाग्यश्री िशदे यांची फेरनिवड करण्यात आली. आटपाडीमध्ये सुमन देशमुख व भीमराव वाघमारे यांची निवड करण्यात आली. तासगावमध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील समर्थक हर्षला पाटील आणि विश्वास माने पाटील यांची सभापती व उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. कवठेमहांकाळमध्ये वैशाली पाटील व जगन्नाथ कोळेकर, खानापूरमध्ये वैशाली माळी व सुहास बाबर आणि जतमध्ये लक्ष्मी मासाळ व दिलजादा जहागीरदार यांची निवड करण्यात आली. शिराळा येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे चंद्रकांत पाटील सभापती आणि सम्राटसिंह नाईक उपसभापती म्हणून निवडले.