एखादी स्त्री कितीही उच्च पदावर पोहोचली तरी माहेरच्या माणसांच्या भेटीने, त्यांच्याकडून होणाऱ्या मायेच्या वर्षांवाने कशी हरखून जाते याचे प्रत्यंतर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या चिपळूण-रत्नागिरी भेटीच्या निमित्ताने गेले तीन दिवस आले.
राज्यातील शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ चालवल्या जात असलेल्या ग्रंथालयांच्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी सुमित्राताई गेल्या शुक्रवारी (९ जानेवारी) चिपळुणात दाखल झाल्या आणि लोकसभाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच माहेरी आलेल्या आपल्या या लाडक्या लेकीचा चिपळूणकरांनी जणू ताबाच घेतला. नक्षीदार रांगोळ्या नि हार-फुलांचा वर्षांव हे दृश्य तर सर्वत्र होतेच, पण त्याहीपेक्षा, त्यांच्या पदाचे दडपण न घेता समवयस्कांनी प्रेमभराने दिलेली आलिंगने, हास्यविनोद आणि मनाच्या कुपीत साठवून ठेवलेल्या पूर्वस्मृतींच्या अत्तराचा दरवळ सर्वत्र व्यापून राहिला होता. पूर्वी भेटलेले कुणी तरी या भेटीपर्यंत काळाच्या पडद्याआड गेल्याचे जाणवताच काही क्षण मन गलबलून जात होते, पण त्यांच्या पुढच्या पिढीच्या भेटीने नात्याचा नवा धागा जोडला जात होता. त्यांनाही त्यांच्या पूर्वसुरींच्या कर्तृत्वाची, योगदानाची आपुलकीच्या भावनेने जाणीव करून दिली जात होती. अनेक जण आपल्या ताईच्या आवडीच्या वस्तू घेऊन आले होते, तर कोणी ताईसाठी खास बनवलेला खाऊ हाती देऊन जात होते. सरोज नेने या जिवलग मैत्रिणीने तर ताई लोकसभाध्यक्ष झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रीय बातम्यांच्या कात्रणांचा केलेला नीटस संग्रहच आपल्या मैत्रिणीला सादर केला. संध्याकाळी झालेल्या नागरी सत्कारात सुमित्राताईंना खास माहेरची साडी देण्यात आली. या साऱ्या हृद्य अनुभवांची आवर्जून दखल त्यांनी उत्तरादाखल केलेल्या भाषणात घेतलीच, शिवाय जुन्या स्मृतींना उजाळा देताना जात, धर्म, पंथ न मानता जीवनात माणुसकीच्या भावनेला सर्वोच्च स्थान देत एकोपा राखण्याचा संदेश अतिशय प्रभावीपणे दिला. आपल्या देदीप्यमान वाटचालीचे श्रेय सुमित्राताईंनी, या गावाने बालपणी केलेल्या संस्कारांना दिले आणि म्हणूनच तुम्ही केलेला हा सत्कार म्हणजे त्या सत्प्रवृत्तींनाच दाद असल्याचे सांगत मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.  
कोकणचा निसर्ग जपा
एकीकडे सर्वत्र असे कौटुंबिक जिव्हाळ्याचे वातावरण असताना कोकणच्या विकासाबाबत बोलताना मात्र सुमित्राताईंनी पर्यटनाला चालना जरूर द्या, पण तसे करताना इथला निसर्गही जपा, असा रोखठोक सल्ला दिला. गणपतीपुळ्याच्या परिसरात दिसणारे प्लास्टिकचे साम्राज्य मन उद्विग्न करते, असे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले.
चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलच्या सुमित्राताई माजी विद्याथिर्नी. त्यामुळे या कर्तबगार विद्यार्थिनीचा काल शाळेत खास सत्कार आयोजित करण्यात आला. त्यांचे बंधू अशोक साठे हेही याप्रसंगी उपस्थित होते. या भावंडांनी दिलेल्या देणगीतून उभारण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन करताना दोघांनीही अतिशय भावुकपणे तो काळ श्रोत्यांसमोर उभा केला.
विविध औपचारिक-अनौपचारिक कार्यक्रम, भेटीगाठी करत काल संध्याकाळी सुमित्राताई रत्नागिरीला रवाना झाल्या. पण माहेरच्या या अल्प काळाच्या वास्तव्यात त्यांचा साधेपणा, प्रांजलपणा, सहज संवाद साधण्याची हातोटी, प्रसंगी आनंदाश्रूंना मोकळेपणाने वाट करून देण्याची निरागसता साऱ्यांनाच इतकी भावली की, एरवी व्हीव्हीआयपीच्या बंदोबस्तासाठी कडकपणे उभे राहणाऱ्या पोलिसांनीही त्यांच्या भाषणातील भावलेल्या मुद्दय़ाला उत्स्फूर्त टाळी दिली. रत्नागिरीत शनिवारी संध्याकाळी सुमित्राताई प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी या प्रसंगी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. स्त्री मुक्तीच्या मुद्दय़ाबाबत अनेकदा जाणवणाऱ्या वैचारिक गोंधळावरही सुमित्राताईंनी नेमके बोट ठेवले.