#10YearsChallenge हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. अनेकजण आपला १० वर्षापूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळतोय. याच अनुषंगाने विचार केला तर राजकीय नेत्यांचं पक्षांचं काय झालं? याचाही उहापोह करता येऊ शकतो. महाराष्ट्रातलं एक झंझावाती नाव ज्या नावापुढे वादळी, आक्रमक ही विशेषणं लागली असा नेता म्हणजे राज ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंना आपला विठ्ठल मानून राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि तिथून सुरू झाला तो एका वादळाचा प्रवास! मात्र गेल्या दहा वर्षात म्हणजेच राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.

९ मार्च २००६ ला राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. मराठी माणसापुढे एक नवा पर्याय निर्माण केला, नव्या अपेक्षा निर्माण केल्या असे वाटत होते. मात्र मनसेचं इंजिन पुढे जाऊन भरकटलं. गेल्या दहा वर्षातला विचार केला तर राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला म्हणजेच मनसेला मिळालेलं यश हे काही काळापुरतं मर्यादित ठरलं. २००६ मध्ये जेव्हा मनसेची स्थापना झाली त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले. तर तेरा जागांवर क्रमांक दोनची मतं मनसेला मिळाली. २९ जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.

यानंतर आल्या २०१२ च्या महानगरपालिका निवडणुका. या निवडणुकांमध्येही मनसेने बाजी मारली. नाशिक महानगरपालिकेची सत्ताही काबीज केली. तर मुंबई महापालिकेत २८, ठाणे महापालिकेत ७, उल्हासनगरमध्ये १, पुणे महापालिकेत २९, पिंपरी मध्ये ४, अकोला महानगर पालिकेत १ जागा मिळवत यशस्वी घोडदौड सुरु ठेवली. मात्र २०१४ हे असं वर्ष होतं ज्या वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसे निष्प्रभ ठरली. कारण या निवडणुकांमध्ये मनसेला अवघी एक जागा मिळाली. यानंतर मनसेला जी उतरती कळा लागली ती लागलीच. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही मुंबईत मनसेचे फक्त सात नगरसेवक निवडून आले. यापैकी सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले त्यामुळे मुंबईत मनसेचा एकमेव नगरसेवक आहे. नाशिक महापालिका चक्क भाजपाने काबीज केली. जशी मनसेला उतरती कळा लागली तशीच ती राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वालाही लागली. कारण शिवसेनेला नावं ठेवत बाहेर पडलेले राज ठाकरे मग टाळीसाठी हात पुढे करू लागले. मातोश्रीवर फोन करू लागले.. आक्रमकता थोडी बाजूला पडली. अगतिकता दिसू लागली.

खरंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या ऑटोबायोग्राफीच्या प्रकाशन सोहळ्याला राज ठाकरे यांनी अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, लता मंगेशकर, शरद पवार, अमिताभ बच्चन या सगळ्यांना एकाच मंचावर आणण्याचा सोहळा दिमाखात साजरा केला. मात्र आतून कुठेतरी ते स्वतःला चाचपडून पहात होते. आपण पक्ष स्थापन केला तर गर्दी जमवू शकतो का? याचा अंदाज कुठेतरी त्यांनी या सोहळ्यातून घेण्याचा प्रयत्न केला. ती जमवू शकतो ही खात्री पटल्यानंतर त्यांनी पक्ष स्थापनेची तयारी केली असावी अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती. मनसेची सुरुवात ही अत्यंत धडाक्यात झाली होती. मराठीचा मुद्दा, मराठी पाट्यांचा मुद्दा, टोलचं आंदोलन या सगळ्या गोष्टी मनसे स्टाईलनेच झाल्या. त्या शिवसेनेशी इतक्या मिळत्याजुळत्या प्रमाणात होत्या की शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा मनसेने सहज हायजॅक केला अशीही चर्चा त्यावेळी रंगली. २०१४ नंतर या सगळ्या गोष्टींचा आलेख खालावला.

२०१९ या वर्षातच विधानसभा निवडणुका होणार आहेत. शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमधली सुंदोपसुंदी रोज समोर येतेच आहे. अशात मनसे हा चांगला पर्याय म्हणून निवडला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी राज ठाकरेंनी पक्ष, त्यातले कार्यकर्ते यांना बळ देणं गरजेचं आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंनी जशी त्यांच्यानंतरच्या नेत्यांची दुसरी फळी तयार केली तशी ती मनसेत दिसत नाही. त्याचमुळे शिशिर शिंदे, राम कदम, प्रवीण दरेकर, हर्षवर्धन जाधव या सगळ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यानंतर सुधीर जोशी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर अशा नेत्यांची फळी उभी केली. मात्र मनसेत दुर्दैवाने राज ठाकरे सोडले तर कोणीही दुसऱ्या फळीतला नेता दिसत नाही. हे या पक्षाचे सर्वात मोठे अपयश मानले जाते आहे.

शरद पवारांनी दिलेला सल्ला ऐकून राज ठाकरे लवकर उठू लागले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर हळवं झालेलं त्यांना महाराष्ट्रानं पाहिलं आहे. त्यांच्यातला हजरजबाबीपणा आजही तसाच टिकून आहे, तसंच त्यांचं टायमिंगही जबरदस्त आहे. कमी झाली आहे ती आक्रमकता. मनसे या पक्षाला उभारी कशी मिळेल यासाठी राज ठाकरे विचार करत असणार यात शंकाच नाही. त्याचमुळे ते आता सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यांची व्यंगचित्रं अधिक धारदार झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात असोत किंवा सत्ताधारी सेना भाजपा विरोधात असणारी त्यांची व्यंगचित्रं सगळ्यांच्याच पसंतीला उतरत आहेत. राज ठाकरे आणि मनसे या दोघांनाही आवश्यकता आहे ती एका मोठ्या विजयाची. एकहाती सत्ता द्या महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन असे राज ठाकरे पहिल्यापासून सांगत आहेत. मात्र मनसे हा भक्कम पर्याय आहे असे अजून महाराष्ट्राच्या जनतेला वाटत नाही हेच निवडणुकांचे निकाल सांगत आहेत. मागील दहा वर्षात राज ठाकरेंमध्ये झालेले अनेक बदल महाराष्ट्रानं पाहिले आहेत. पक्षाची वाट बिकट असताना राज ठाकरे मात्र डगमगलेले नाहीत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुका ही राज ठाकरेंसाठी चांगली संधी आहे. त्या संधीचं सोनं करत राज ठाकरे विजयाकडे कूच करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दहा वर्षांपूर्वी मनसेबद्दल चर्चा होत होती की हा पक्ष किंगमेकर ठरेल. आता चर्चा होते आहे या पक्षाचं अस्तित्त्व टीकणार की नाही याची. राजाला जनतेची साथ मिळणार का? राज ठाकरे नवी भरारी घेतील का? निवडणुकांमध्ये यशस्वी होतील का? हे सगळे लोकांना त्यांचे काय मत पटते आणि ते कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जातील या सगळ्यावर सारं गणित अवलंबून आहे. सध्या राज ठाकरे वर पित्याच्या भूमिकेत आहेत. कारण त्यांच्या मुलाचे लग्न २७ जानेवारीला आहे. त्यानंतर निवडणुकांच्या घोडामैदानाला राज ठाकरे सक्षमपणे समोर जातील अशी अपेक्षा आहे.

समीर चंद्रकांत जावळे
sameer.jawale@gmail.com