शरद पवार यांच्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतं असं कायमच म्हटलं जातं. आज पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली ती त्यांच्या ईडी कार्यालयात न जाण्याच्या निर्णयामुळे. २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा या नेत्याच्या भोवती फिरलं नुसतं फिरलंच नाही तर ढवळून निघालं. मग बारामती बंद असो, परळी येथील बंद असो किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया असोत. प्रत्येकाच्या केंद्रस्थानी शरद पवार होते.

२३ सप्टेंबर रोजी ईडीने शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे घडल्याने साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही “माझ्या दौऱ्यांना मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे ही कारवाई झाली ” असा दावा केला. मात्र चार दिवसात घडलेल्या या सगळ्या घडामोडींवर लक्ष केंद्रीत केलं तर राज ठाकरे हे शरद पवारांबाबत काय म्हणाले होते त्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

शरद पवार यांच्या पंचाहत्तरीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी होती. अगदी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती होती. त्यावेळी राज ठाकरेंनी एक भाषण केले होते. या भाषणात राज ठाकरे यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘तेल लावलेला पैलवान’ असा केला होता. त्याच शब्दांची प्रचिती आज महाराष्ट्रानं पुन्हा एकदा घेतली आहे असंच म्हणता येईल. १२ डिसेंबर २०१५ रोजी हा कार्यक्रम झाला होता.

काय म्हणाले होते राज ठाकरे?
“मी अनेकदा शरद पवारांबाबत अनेक प्रकारचे मथळे वाचले आहेत. त्यातला अगदी सर्वांना माहित असलेला मथळा म्हणजे ‘तेल लावलेला पैलवान!’ हे मला आज पटतं आहे. हाताला लागत नाही, हाताला सापडत नाहीत याचा अर्थ काय? ते आज कळतं आहे. माफ करा मात्र एका आजाराच्या हातालाही पवारसाहेब लागले नाहीत. तिथूनही निसटले. हे साधंसुधं काम नाही. एक वेगळ्या प्रकारचं रसायन देवानं घडवलं आणि या महाराष्ट्राला ते दिलं. असा एकही विषय नाही की शरद पवार यांना त्याचा क्षणाचाही विचार करावा लागतो. प्रत्येक विषयातला त्यांचा अभ्यास प्रचंड गाढा आहे. विजय तेंडुलकर यांच्या पुस्तकाचं शीर्षक पवारांच्या बाबतीत अगदी खरं आहे हे सगळं येतं कुठून? शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते. मला अनेकदा लोक सांगतात की पवार साहेबांनी तुमची स्तुती केली तेव्हा मला वाटतं की मी काय केलं आता? हे काही साधं सोपं नाही.”

असं म्हणून राज ठाकरे यांनी ‘तेल लावलेला पैलवान’ अशी शरद पवार यांच्याबाबत दिल्या जात असणाऱ्या मथळ्याची आठवण करुन दिली होती. २३ सप्टेंबरपासून २७ सप्टेंबरपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहिल्या तर ईडीने शरद पवार यांच्याविरोधात जो गुन्हा दाखल केला होता आणि अडचणी वाढवण्याचं काम केलं होतं त्या अडचणीही निष्प्रभ करण्याचं काम शरद पवार यांच्या एका घोषणेनं केलं. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आपण स्वतःच ईडीच्या कार्यालयात शुक्रवारी जाणार असल्याचं जाहीर केलं. एवढंच नाही तर शिवरायांचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या एका घोषणेमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा चार दिवस शरद पवार या एका नावाभोवती फिरलं. शरद पवार यांच्या धक्का तंत्राच्या राजकारणाचा अनुभव महाराष्ट्राने अनेकदा घेतला आहे. आज पुन्हा एकदा शरद पवार यांना ‘तेल लावलेला पैलवान’ का म्हणतात तेदेखील महाराष्ट्राने पाहिलं आणि अनुभवलं. तसंच राज ठाकरे यांनी २०१५ मध्ये केलेल्या वक्तव्याची या निमित्ताने पुन्हा आठवण आली हेही नक्की!

समीर चंद्रकांत जावळे

sameer.jawale@indianexpress.com