समीर जावळे 

‘विचारांचं सोनं लुटायला चला’ असं घोषवाक्य म्हटलं की समोर येतो तो शिवसेनेचा दसरा मेळावाच. कारण या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे रोखठोक विचार ऐकायला मिळत. त्यांच्यानंतरही ही परंपरा सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकायला मिळत आहेत. मात्र काल म्हणजेच दसऱ्याच्या संध्याकाळी झालेल्या या मेळाव्यात मात्र उद्धव ठाकरेंनी जे भाषण केले ते ऐकून ते विचारांचं सोनं नाही तर लोकप्रिय घोषणांचा पाऊस असलेलं भाषण होतं हे स्पष्ट होतं. ‘गोरगरीबांना अवघ्या दहा रुपयात चांगल्या दर्जाचं जेवण’, ‘घरगुती वापराच्या विजेसाठी पहिल्या ३०० युनिटला ३० टक्के सवलत’, ‘एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी’, ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार’, ‘ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा’ या घोषणांवर आधारीत हे भाषण होतं. यामध्ये आश्वासनं होती विचारांचं सोनं कुठे होतं? ते तर तोंडी लावण्यापुरतंही नव्हतं.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशावेळी एखादा अभ्यास न केलेला मुलगा ज्याप्रमाणे परीक्षेच्या तोंडावर सगळी घोकंपट्टी करुन तयारी करुन येतो आणि मीच कसा हुशार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तसलं काहीसं उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं स्वरुप होतं.

‘Public memory is too short’ असं कायम म्हटलं जातं. ते अगदी खरं आहे. याचं कारण गेल्या वर्षीच्या दसऱ्या मेळाव्यापर्यंत किंवा अगदी लोकसभा निवडणुकीसाठीची युती जाहीर होईपर्यंत उद्धव ठाकरे काय बोलत होते ते जरा आठवून पाहा. “पंतप्रधानांनी धनुष्य बाण हाती घेऊन रावण दहनासाठीचा बाण सोडला. तो धनुष्यबाण आमचाच आहे. हातात धनुष्यबाण धरण्यासाठी मर्द असावं लागतं. धनुष्यबाण पेलायला छाती किती इंचाची ते महत्त्वाचं नाही तर मनगटात जोर किती आहे ते जास्त महत्त्वाचं आहे”असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींना टोला लगावला होता. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुनही उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र कालच्या भाषणात इंधन दरवाढीच्या विषयाला उद्धव ठाकरेंनी स्पर्शही केला नाही. “कानपिचक्या देणं, कान टोचणं हे शिवसेनेला जमत नाही शिवसेना कानाखाली आवाज काढते ” सध्या देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी आणि मंगळ आहेत असा टोमणाही उद्धव ठाकरेंनी मोदी आणि अमित शाह यांना लगावला होता. एवढंच नाही तर वक्री झालेल्या ग्रहांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. “२०१४ सालची हवा आता राहिलेली नाही हे तुम्हाला ठाऊक आहे. उधळलेला अश्वमेध अडवण्याचं काम महाराष्ट्रानं केलं होतं. त्यासाठी मला तुमची साथ लाभली आहे. तुमचा झेंडा तुम्ही अनेकांच्या हाती दिला आहे. मात्र त्यासोबत दांडाही असतो जर जबाबदारीनं वागला नाहीत तर झेंडा उडून जाईल आणि तुमच्या डोक्यात दांडा बसेल हे विसरु नका. देशातला सध्याचा (२०१८) कारभार पाहिल्यानंतर बोलायचं नाही तर काय करायचं? तुमची आरती ओवाळायची का?” असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला होता.

महागाईचा मुद्दा, स्त्रियांवरचे अत्याचार, काश्मीर प्रश्न या सगळ्याबाबत उद्धव ठाकरेंनी भाष्य करत भाजपावर कडाडून टीका केली होती. मात्र काल झालेल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात या सगळ्या मुद्द्यांना सोयीस्कर बगल देण्यात आलेली दिसली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला.

‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी युतीची अवस्था होती हे स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगितलं. युतीची अवस्था त्याही पेक्षा वाईट होती हे महाराष्ट्राने पाहिलं. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी जेव्हा उद्धव ठाकरे पंढरपूरला गेले होते. त्यावेळी त्यांनी ‘चौकीदार चोर है’ असंही वाक्य उद्गारलं होतं. मात्र आता उद्धव ठाकरे यांना हे काहीही आठवत नसावं. त्यांच्या विचारांच्या सोन्याला बहुदा सत्तेचा मुलामा चढलेला असावा त्यामुळे त्यांनी कोणतेही विचार उपस्थित न करता आपल्या भाषणात लोकप्रिय घोषणा दिल्या.

१९९५ मध्ये जेव्हा झुणका भाकर केंद्रं सुरु झाली त्याची अवस्था काय झाली? हे मुंबईत फिरलं तरीही लगेच कळतं. लोकांच्या काळजाला हात घालायचा आणि भावनेचं राजकारण करायचं ही बाब प्रत्येकच पक्ष करत आला आहे. गर्वसे कहों हम हिंदू है, मराठी माणूस याभोवती आणि त्याच्या भाबड्या भावनांभोवती शिवसेनेचं राजकारण फिरत आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातली शिवसेना आणि त्यांच्यानंतरची शिवसेना यामध्ये जमीन आस्मानाचा फरक पडला आहे. शिवसेनेच्या वाघाची डरकाळी इतकी सौम्य झाली आहे की त्याला डरकाळी म्हणायचं की नाही हा प्रश्न पडावा. भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा जेव्हा करण्यात आली तेव्हा आमचं सगळं ठरलंय असं दोन्हीकडचे नेते सांगत होते. प्रत्यक्षात जो फॉर्म्युला समोर आला त्यावरुन मात्र भाजपाच्या आता मोठ्या भावाच्या भूमिकेत गेला आहे हे स्पष्ट झालं.

शिवसेनेला १२४ जागा, भाजपा आणि मित्रपक्षांना १६४ जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे ज्या शिवसेनेने कमळाबाई, लहान भाऊ असं म्हणत इतके दिवस भाजपाला टोमणे मारले त्याच भाजपाने शिवसेनेला तुम्हाला सत्तेत रहायचं असेल तर आमच्याशिवाय पर्याय नाही हे कृतीतून दाखवून दिलं. आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आलो आहोत हे वाक्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत उच्चारलं होतं. ज्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणातही केला. मात्र ते का एकत्र आले आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे.

दसरा मेळाव्याच्या ३५ मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी काश्मीर प्रश्न, राम मंदिर हे मुद्देही मांडले. तसेच विरोधकांवरही टीका केली. अजित पवार यांच्या अश्रूंना मगरीचे अश्रू म्हटलं. शरद पवार यांनी सूडाचं राजकारण सरकार करतं आहे हा जो आरोप केला त्याचाही ठाकरी शैलीत समाचार घेतला. मात्र पाच लोकप्रिय घोषणा त्यांच्या भाषणातला केंद्रबिंदू होता. विचाराचं सोनं म्हणावं अस कालच्या भाषणात काही म्हणजे काहीही नव्हतं.

समीर चंद्रकांत जावळे
sameer.jawale@indianexpress.com