बचावासाठी विशेष मोहीम

नागपूर : आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) ‘लाल यादीत’ लुप्तप्राय प्रजाती म्हणून नोंद झालेल्या माळढोक पक्ष्याला वाचवण्यासाठी सँच्युरी नेचर फाऊंडेशन, कन्झर्वेशन इंडिया आणि द कार्बेट फाऊंडेशन यांनी आपत्कालीन मोहीम सुरू केली आहे. जगभरात पक्ष्यांना वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रणनीतीचा वापर या मोहिमेसाठी करण्यात आला आहे. यात माळढोकचा वावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण ठिकाणांवरील वीज तारा भूमिगत करणे, या पर्यायाचा समावेश आहे.

गेल्या ५० वर्षांत ९० टक्के माळढोकचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. या पक्ष्याच्या अलीकडच्या सर्वेक्षणात १५०पेक्षाही कमी जंगलात त्यांचे अस्तित्व राहिले आहे. या सर्वेक्षणात मध्यप्रदेशातून तर ते कधीचेच नाहीसे झाल्याचा निष्कर्ष आहे, तर महाराष्ट्रात त्यांची संख्या केवळ आठ इतकी आहे. कधीकाळी हाच पक्षी भारतातील बारा राज्यात आणि पाकिस्तानच्या काही भागात आढळून येत होता. भारतीय वन्यजीव संस्था (डेहराडून) व  भारतीय विज्ञान संस्था (बंगळुरू) येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात या पक्ष्यांमध्ये एक कमी अनुवंशिक विविधता आढळून आली. त्यावरून त्यांची संख्या गेल्या अनेक वर्षांपासून कमी कमी होत जाऊन संपण्याच्या मार्गावर असल्याचे निष्पन्न झाले.

माळढोक पक्ष्यांचा अधिवास नष्ट होणे हे देखील त्यामागचे एक कारण आहे. याशिवाय शिकार हे देखील महत्त्वाचे कारण आहे. त्यांच्या संरक्षणासाठी कृत्रिम प्रजननासारखे काही प्रयोग राबवण्यात आले, पण ते अयशस्वी ठरले. उच्च दाबाच्या विद्युत तारा हे देखील त्यांची संख्या कमी होण्यामागील एक कारण आहे. राजस्थानच्या थार क्षेत्रात प्रत्येक वर्षी उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांमुळे किमान १८ पक्ष्यांचा मृत्यू होतो. म्हणूनच सँच्युरी नेचर फाऊंडेशन, कन्झर्वेशन इंडिया व द कार्बेट फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन माळढोकच्या बचावासाठी हा शेवटचा प्रयत्न सुरू केला आहे.

ज्या ठिकाणांहून हे पक्षी मोठय़ा संख्येने उडतात, त्या ठिकाणांवरील उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच या तारांवर रिफ्लेक्टर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे वीज वाहिन्यांमध्ये पक्षी दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचू शकतील. जगात काही ठिकाणी हा प्रयोग करण्यात आल्यानंतर माळढोकच्या मृत्यूची संख्या त्यात कमी झाल्याचे सकारात्मक निष्कर्ष मिळाले आहेत. याव्यतिरिक्त माळढोकच्या अधिवासात गवताळ प्रदेश  संरक्षित करण्याची मोहीम राबवली जाणार आहे.

 

भारतातील माळढोक

मध्यप्रदेश      – शून्य

महाराष्ट्र        – आठ

कर्नाटक        – पाच ते दहा

गुजरात – ५०पेक्षा कमी

राजस्थान       – ९० ते १२५

विदर्भात माळढोकचे अस्तित्व काही वर्षांपूर्वी बऱ्यापैकी होते. नागपूरजवळ उमरेड-भिवापूर आणि चंद्रपूरजवळ वरोरा-भद्रावती येथे त्याचे अस्तित्व होते. आता वरोऱ्याला एक-दोन दिसले तर दिसतात. अलीकडेच दोन माळढोक आढळले. मी आणि गोपाळ ठोसर सातत्याने त्याचा मागोवा घेऊन अभ्यास केला आहे. मे ते जानेवारी या त्याच्या प्रजनन कालावधीत आधी सर्वेक्षण व्हायला हवे. त्यातही तो नर आहे का मादी हे आधी पाहायला हवे. त्यानंतर तो घरटे करतो का, हे तपासून त्याचे संवर्धन करायला हवे. ही अभ्यासाची खरी पद्धत आहे. विदर्भासाठी त्याचे नव्याने सर्वेक्षण व्हायला हवे.

– डॉ. अनिल पिंपळापुरे, माळढोक अभ्यासक