News Flash

दिवाळी अंकांचे स्वागत..

विविध विचारांना सामावत ‘अनुभव’ने यंदाचा दिवाळी अंक सादर केला आहे.

अनुभव

विविध विचारांना सामावत ‘अनुभव’ने यंदाचा दिवाळी अंक सादर केला आहे. डॉ. अनिल अवचट, निळू दामले, अरुण टिकेकर, गौरी कानेटकर, रत्नाकर मतकरी या दिग्गज साहित्यिकांनी या अंकात लिहिले आहे. पाकिस्तान जागतिक चिंतेचा विषय का बनला, याचा विस्तृत शोध निळू दामले यांच्या ‘पाकिस्तान : बंद दरवाज्यांचा देश’ या लेखात आहे. मूल जन्मते कसे, याचा वेध डॉ. अनिल अवचट यांच्या ‘जन्मरहस्य’ या लेखात आहे. सध्याचा समाज आर्थिक प्रगती करत असला तरी सामाजिकदृष्टय़ा मागेच आहे, याबाबत ‘पराभूत आम्ही’ या लेखातून अरुण टिकेकर यांनी विस्तृत विवेचन केले आहे. त्याशिवाय मतकरी यांची ‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत’ ही कथा आणि सीमा चिश्ती यांची ‘उन्नी आणि त्यांचा चष्मिस्ट मुलगा’ ही अनुवादित कथाही वाचनीय आहे. त्याशिवाय अंकात तीन पंजाबी कथाही अनुवादित केल्या आहेत.
संपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, पाने : १८०, किंमत: १२० रुपये.
पासवर्ड
दिवाळी म्हणजे अभ्यासाला विश्रांती असे अनेकदा अनुभवास येते. पण दिवाळीचा आनंद लुटताना, फराळ करताना बुद्धीला चालना देणारे खेळ आणि विज्ञान कथांचा खुराक मिळाला तर दिवाळीचा आनंदही द्विगुणित होतो. युनिक फिचर्सचा पासवर्ड अंकही तसाच आहे. डोकेबाज मुलांसाठी भन्नाट खुराक असलेल्या या अंकात भन्नाट कथा, अनुवादित कथा आहेत. त्याचप्रमाणे मुलांना आवडतील अशी मजेशीर माहितीही आहे. विज्ञानाच्या पोतडीतून निघालेल्या कथाही वाचनीय आहेत. केवळ लहानांनाच नव्हे तर मोठय़ांनाही हा अंक निश्चितच वाचायला आवडेल. अंकाच्या मुखपृष्ठावरूनच हा अंक बौद्धिक खाद्य पुरविणारा आहे, याची खात्री पटते. मुखपृष्ठ दीपक संकपाळ यांचे आहे.
संपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी; पाने : ९६, किंमत : १०० रुपये.
यशस्वी उद्योजक
दे आसरा फाऊंडेशनच्या वतीने काढलेल्या या अंकाने वेगवेगळ्या उद्योजकांच्या यशाच्या कहाण्या अत्यंत प्रवाही भाषेत वाचकांपुढे सादर केल्या आहेत. मुखपृष्ठ आणि मांडणी प्रभाकर भोसले यांची असून सुधीर गाडगीळ, डॉ. सतीश देसाई तसेच आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून यशस्वी होणाऱ्यांची ‘विशेष दिवाळी’ हा जान्हवी संतोष यांचा लेख वाचनीय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केलेल्या मेहनतीची आपापल्या झुंजीची कहाणीच सर्व उद्योजकांनी सादर केली आहे.
व्यवस्थापकीय संपादक : एस. आर. जोशी; पाने : ७२, किंमत : ५० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 1:57 am

Web Title: special diwali magazine
Next Stories
1 ‘घेते मी रोखा करुनी, तुम्ही माझे सावकार..!’
2 सिंधुदुर्ग जिल्हा बँक ग्राहकांना नेटबँकिंग सुविधा देणार
3 सावंतवाडीत ‘रंगी रंगला रे श्रीरंग’ महानाटय़ाची निर्मिती
Just Now!
X