जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार, असे चित्र आहे. जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या सूचनेनुसार ३३३ गावांमध्ये ४७१ उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला. यावर ४ कोटी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
जिल्ह्य़ात पावसाळ्याचे अडीच महिने कोरडेच गेले. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र, पावसाने ताण दिल्याने खरीप पिकांची आता सुतराम शक्यता नाही. तसेच कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरासरी जेमतेम २० टक्के पावसाची नोंद झाली. प्रशासनाने जुल ते सप्टेंबरचा विशेष टंचाई कृती आराखडा तयार केला. ३३३ गावात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असून, वसमत तालुक्यातील सर्वाधिक ७५ गावांचा यात समावेश आहे. िहगोली तालुक्यात ७४, औंढा नागनाथ ५३, सेनगाव ७० व कळमनुरी तालुक्यातील ६१ गावांचा समावेश आहे.
तेरा गावातील नळयोजनेची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी १२ लाख खर्च अपेक्षित आहे. तसेच सात तात्पुरत्या नळयोजना सुरू केल्या जाणार असून, त्यासाठी ४५ लाख ९० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. ११६ गावांमध्ये १२७ िवधन विहिरी घेतल्या जाणार असून, त्यासाठी ६७ लाख २१ हजार रुपये, शिवाय २७९ गावांमध्ये ३०५ खासगी विहिरी अधिग्रहण केल्या जाणार आहेत. त्यासाठी १ कोटी ९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ३८ गावांमध्ये ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. सुमारे ७० लाख १० हजार रुपये खर्च त्यासाठी अपेक्षित आहे.