चंद्रपूर जिल्ह्य़ात तीन वर्षांत आठ गुन्ह्य़ांची नोंद; सर्व आरोपींना अटक

नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत या जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांंत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, या कायद्यांतर्गत जिल्हय़ात २०१३ पासून २०१६ मेपयर्ंत सिंदेवाहीत दोन, चिमूरमध्ये दोन, शेगावला दोन, चंद्रपूर एक, वरोरा येथे एक अशी एकूण आठ गुन्हांची नोंद करण्यात आली. या प्रकरणातील सर्व आरोपींनाही अटक  करण्यात आली आहे. लोकांना जादुटोणा दाखवून एखादे काम करून देतो असे भोंदू बाबा सांगत असून ते सामान्य लोकांना अंधश्रद्धेत अडकवण्याचा प्रयत्न करतात. सामान्य लोकही या भोंदू बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अंधश्रद्धेला बळी पडतात. भूतपिशाच्च काढून देतो, चमत्कारी शक्तीचा वापर करून नोकरी लावून देतो, अमाप पैसा पदरी पाडून देतो, असे आमिष दाखवून हे भोंदूबाबा सामान्य नागरिकांना जाळय़ात अडकवून त्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार जिल्हय़ात बघावयास मिळत आहेत. प्रथा, चालीरीती, जादूटोणा आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे अनिष्ट परिणाम हे येथील काही लोकांवर होतांना दिसत आहे.

अशा सर्व प्रकाराला आळा बसावा व लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३’ अस्तित्वात आणण्यात आला आहे. या सर्व प्रकाराला आळा बसावा म्हणून जिल्हय़ातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक विशेष कक्ष स्थापून त्यात एक दक्षता समिती स्थापित करण्यात आली आहे. या दक्षता समितीचे प्रमुख ठाण्याणील पोलीस निरीक्षक असतात. अशा प्रकरणाचा तपास देखील पोलीस निरीक्षक अधिकारीच करीत असतो. समाजातील लोकांमधली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली करण्यात आली असून या समितीमार्फत महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आदी प्रदेशात जनप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहे. बळी ठरणाऱ्यांना मोफत मार्गदर्शनाबरोबर कायद्याचा सल्ला देण्याचे काम हेल्पलाईनच्या माध्यमातून केल्या जात आहे. येत्या काळात कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडू नये व अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन दलातर्फे करण्यात आले आहे.

विशेष कक्ष व दक्षता समिती स्थापन

या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हय़ातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष कक्ष व दक्षता समिती स्थापन केली असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. तसेच या संदर्भात नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काम करीत असल्याचेही ते म्हणाले.