सुहास बिऱ्हाडे

तक्रारी आणि असमाधानकारक काम

बेपत्ता मुलांचा शोध, अल्पवयीन मुलींची सुटका आदी विविध कामे करून नावारूपाला आलेली पालघर पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची पथके बरखास्त करण्यात आली आहेत. या पथकांविरोधात सातत्याने तक्रारी वाढत असून काम समाधानकारक नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पालघर भौगोलिकदृष्टय़ा मोठा असून सर्वाधिक लोकसंख्या वाढ होत असलेला जिल्हा आहेत. जिल्ह्य़ात २३ पोलीस ठाणी आहेत. कायदा सुव्यवस्था राखणे, गुन्ह्य़ांचा तपास करणे आदी कामांच्या वाढत्या प्रमाणामुळे स्थानिक पोलिसांना विशेष मोहिमा राबविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पोलीस अधीक्षक आणि वसईच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक स्थापन केले होते.

हे पथक पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसाठी कार्यरत होते. जी कामे स्थानिक पोलीस ठाणे करत नव्हती ती कामे ही विशेष पथके करत होती. वसईतील अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी तर बेपत्ता आणि अपहृत मुलामुलींच्या शोधाचे मोठे काम केले होते. त्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकांला गौरविण्यातदेखील आले होते. परंतु आता या दोन्ही पथकांतील पोलिसांचे निष्क्रिय काम, सातत्याने होणारे आरोप, खंडणीच्या तक्रारी वाढल्या आहेत.

त्यामुळे शेवटी ही दोन्ही विशेष पथके बरखास्त करण्यात आली आहेत.  गेल्या काही दिवसांपासून पालघर पोलीस वादात सापडले आहेत. लाचखोरीत अडकण्याचे पोलिसांचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच नालासोपारा येथील एका पोलीस उपनिरीक्षकांवर अमली पदार्थाचा सहभाग आढळून आला, तर अनेक पोलीस रडारवर आहेत. त्यातच आता ही विशेष पथके बरखास्त करण्याची नामुष्की ओढवली आहे.

वरिष्ठांची दिशाभूल करण्याचे प्रकार

अनेकदा स्थानिक पोलीस हितसंबंधामुळे कारवाई  न करणे किंवा वरिष्ठांची दिशाभूल करणे असे प्रकार होत. अशावेळी पोलीस अधीक्षक विशेष पथक पाठवून कारवाई करायचे. काही महिन्यांपूर्वी महामार्गावर  एका हॉटेलातील जुगारावर कारवाई करण्याचे आदेश दिले  होते.  त्यावर वालीव पोलिसांनी दिखाऊ  कारवाई केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी  पथक पाठवून खरी कारवाई केली. यानंतर त्या पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले.

विशेष पथकाची गौरवास्पद कामगिरी होती

वसई विरारमधून अनेक अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली होती, त्यांचे अपहरण झाले होते. वसईचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी आपल्या विशेष पथकामार्फत अनेक मुलांचा शोध लावला होता. यासाठी रोशन तसेच पथकातील उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

मध्यंतरी पथकांवर आरोप झाले. त्यामुळे आम्ही ही पथके बरखास्त केली आहे. आता ही कामे स्थानिक पोलिसांमार्फत करवून घेतली जातील. कामावर कुठला परिणाम होणार नाही.

– गौरव सिंग, पोलीस अधीक्षक, पालघर