News Flash

‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके 

दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता उद्या, रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीने होणार आहे.

गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी, शनिवारी रात्री देखावे पाहण्यासाठी नगरकरांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. (छाया-अनिल शाह, नगर).

गणेशोत्सवाची आज सांगता; मोठा बंदोबस्त तैनात

दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता उद्या, रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी तरुण मंडळे व जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. जिल्ह्य़ातील मिरवणूक न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ‘डीजे’मुक्त व्हावी, यासाठी खास पथके तैनात करण्यात आलेली आहेत.

पोलिसांनी ‘डीजे’ वाजवण्यास परवानगी दिलेली नसली, तरी शहरातील काही मंडळे त्यासाठी डीजे लावण्याच्या मागणीसाठी कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री ठाण मांडून बसली होती. मोहरमची मिरवणूक विक्रमी कमी वेळेत शांततेत पार पडल्याने जिल्हा पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे. जिल्ह्य़ात गणेश विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेची खास पथके नियुक्त केली आहेत.

या पथकाला डीजे सिस्टम जप्त करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शनिवारी रात्रीपासूनच नगर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गाची नाकेबंदी करण्यात आलेली होती. दरम्यान, मिरवणुकीतील शिवसेनेचे मंडळ मिरवणुकीत डीजे वाजवणारच, मात्र त्याचा आवाजाची मर्यादा न्यायालयाच्या निकषांनुसार असेल, असे शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक दिलीप सातपुते यांनी सांगितले.

जिल्ह्य़ात ३ हजार २९६ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यात १६८ खासगी आहेत. २ हजार ८३१ मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. नगरचे शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम पाटील यांनी सकाळी शहरातील परवानगी मागितलेल्या १५ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत, त्यांना डीजेमुक्त मिरवणूक काढण्याबरोबरच प्रत्येक मंडळांना विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक ठरवून दिले आहे.

नगरचे ग्रामदैवत विशाल गणेशाच्या उत्सवमूर्तीची सकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उत्थापनाची पूजा होईल. त्यानंतर रामचंद्र खुंटावरून दुपारी १२ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल, व मिरवणूक पारंपरिक मार्गाने जाईल. नगर शहरातील मिरवणूक मार्गाच्या बंदोबस्ताची जबाबदारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती मार्गाबरोबरच सावेडी व केडगावमध्ये स्वतंत्र मिरवणुका निघतील.

४ ड्रोन कॅमेरे व ८ दंडाधिकारी

नगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी तब्बल १६७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. काही ठिकाणी छुपे कॅमेरेही आहेत. मिरवणूक मार्गावरील इमारतींवर व प्रमुख चौकात ‘वॉच टॉवर’ही उभारण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर ८ कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील ४५० समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगर शहराचा बंदोबस्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या नियंत्रणाखाली काम करेल. त्यांच्या नेतृत्वाखाली ५ उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ४० सहायक निरीक्षक, १ हजारावर कर्मचारी गृहरक्षक दलाचे २२० जवान, १ हजार ३०० स्वयंसेवक, एसआरपीएफची १ कंपनी, शीघ्र कृती दल १ व धडक कृती दल २ तैनात असतील.

१३ धडक कृती दले

जिल्ह्य़ातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्ह्य़ा बाहेरहूनही बंदोबस्त मागवण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा त्यावर नियंत्रण ठेवून असतील. याशिवाय जिल्ह्य़ासाठी भारतीय पोलिस प्रशासनातील तीन अतिरिक्त अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उपअधीक्षक १५, पोलीस निरीक्षक ३८, सहायक निरीक्षक ९२, पोलीस कर्मचारी ४ हजार, गृहरक्षक दलाचे १ हजार जवान, २ हजार ८०० स्वयंसेवक, राज्य राखीव दलाच्या २ कंपन्या, धडक कृती दले ११, शीघ्र कृती दले २, ध्वनिमापक यंत्रे ४२.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 1:05 am

Web Title: special teams of police for dj free procession
Next Stories
1 नोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे
2 महाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र – फडणवीस
3 अलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरूवात
Just Now!
X