-मंदार लोहोकरे

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून ४८ दिवस परप्रांतीय जिल्ह्यात अडकून होते. अशा जवळपास ९८१ प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. या रेल्वेतून हे सर्व प्रवासी तामिळनाडूकडे रवाना झाले. पंढरपुरातून ही रेल्वे शनिवारी दुपारी तामिळनाडूकडे निघाली असून रविवारी सकाळी ९ वाजता तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येथे पोहचणार आहे. रेल्वे निघाल्यावर सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजवून आणि जय महाराष्ट्र म्हणत प्रशानाला धन्यवाद दिले.

पंढरपूर रेल्वे स्थानकात शनिवारी प्रवाशांची लगबग दिसून आली. हे सर्व प्रवासी आप-आपल्या गावी परतण्यासाठी एकत्र जमले होते. शनिवारी दुपारी दोन वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे स्थानकात आली. दरम्यान, या रेल्वेचे सोलापुरात तसेच पंढरपुरात देखील निर्जंतुकिकरण करण्यात आले. साधारण बारा बोगी असणाऱ्या रेल्वेगाडीतून ९८१ प्रवासी रवाना झाले. यामध्ये एका रेल्वेच्या बोगीमध्ये ८० प्रवाशी मर्यादा असताना. एका बोगीत केवळ ५२ प्रवासी सोशल डिस्टन्सचे पालन करून पाठवण्यात आले. ही रेल्वे पंढरपूरहून  निघाल्यावर कोणत्याही स्टेशनवर न थांबता थेट तिरुचिरापल्ली या शेवटच्या स्टेशनवर रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पोहचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

परप्रांतीय मजूर,विद्यार्थी यांना घरी पाठवण्यासाठी सुरवातीला एस.टी.,खासगी वाहन यांची माहिती घेतली. मात्र अखेर एका रेल्वेचे नियोजन केले याद्वारे जिल्ह्यातील आणि उस्मानाबाद येथील असे ९८१ प्रवाशी आपल्या गावी परतल्याची माहिती पंढरपुरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.  तर या प्रवाशांसाठी प्रशासनाच्या व विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीने जेवण,पाण्याची व्यवस्था केली गेली. या वेळी पंढरपूर रेल्वे स्थानकात येऊन या प्रवाशांना येथील प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपाधीक्षक डॉ. सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे , गटविकास अधिकारी रविकिरण घोडके ,पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पंढरपूर स्थानकाचे स्टेशन प्रबंधक श्रीवास्तव आदींनी निरोप दिला. या रेल्वेत पंढरपूर -६१० , माढा – २७, मंद्रूप -४७,  सोलापूर शहर -१७९, उत्तर सोलापूर -२८, उस्मानाबाद जिल्हा – ९०  असे प्रवासी होते.

प्रशासनाचे मनापासून आभार : लहू कुमार
लॉकडाउनमुळे सोलापूर  जिल्ह्यासह उस्मानाबाद येथील  आम्ही ९८१ प्रवाशी अडकलो होतो. या काळात प्रशासनाने आमची राहण्याची,खाण्याची व्यस्था केली. आम्हाला गावी जाण्यासाठी तहसीलदार,प्रांताधिकारी यांनी खूप मदत केली. सर्व जणांना प्रत्येकी ५६० रुपये तिकीट आकारण्यात आले. आम्ही सर्वांनी रेल्वे प्रशासनाकडे एकूण ५ लाख ४९ हजार ३६० रुपये भरले. मात्र या काळात प्रशासनाने खूप काळजी घेली हे सांगताना लहू कुमार यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.