29 September 2020

News Flash

गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे धावणार

राज्य सरकारने दिली परवानगी

फाइल फोटो

लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली. नुकतीच एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणसाठी धावतील. विलगीकरणाच्या अटीमुळे आधीच मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणसाठी रवाना झाल्याने विशेष रेल्वेचा कितपत फायदा असाही प्रश्न आहे .

राज्य सरकारने मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात कोकणसाठी विशेष रेल्वेंचे  नियोजन करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे मागणीनुसार गाड्या सोडतानाच कन्फर्म तिकीट आणि ई-पास असलेल्यांनाच यातून प्रवासाची मुभा देण्याच्या सूचना आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान शारीरीक अंतर राखणे, सॅनिटाईज करणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आम्ही लवकरच माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया दिली. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणातील आपल्या गावी मोठ्या संख्येने भक्त जातात. रेल्वेकडून नियमित गाड्या सोडतानाच विशेष रेल्वे गाड्यांचेही नियोजन के ले जाते. यंदा टाळेबंदीमुळे कोकणसाठी रेल्वे सुटणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला. श्रमिक ट्रेन्स सोडल्या, त्यामुळे गणेशोत्सवासाठीही ट्रेन्स सोडण्याचीही मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली.

२२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या अटीमुळे गेल्या आठवड्याभरापासून खासगी वाहनांनी अनेकांनी कोकण गाठले. त्यापाठोपाठ नुकतेच एसटी सोडण्याचीही घोषणा करण्यात आली. मात्र १२ ऑगस्टपूर्वी पोहोचल्यास दहा दिवसांचे विलगीकरणाची नवीन अट शासनाकडून घालण्यात आली आहे आणि त्यानंतर गावी जायचे असल्यास ४८ तास पूर्वी करोनाची चाचणी करणे बंधनकारक केले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून याच अटी-शर्थीचे पालन करुन विशेष रेल्वे  सोडणार की कसे याबाबतही स्पष्ट होणार आहे.

सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत. मात्र या गाड्यांमधून राज्यांतर्गत प्रवासाची मुभा नाही. तो प्रवासी राज्याबाहेरच जाऊ शकतो किंवा अन्य राज्यातून महाराष्ट्रातील स्थानकात उतरु शकतो. त्यामुळे सध्या कोकणामार्गे धावत असलेल्या विशेष गाड्यांमधून कोकणातील गणेशभक्तांना प्रवासाची मुभा दिल्यास त्याप्रमाणेही नियोजन करावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 11:51 pm

Web Title: special trains to kokan for ganpati utsav scj 81
Next Stories
1 चंदगड तालुक्यात दोरखंडाचा वापर करून बचावकार्य, सुसज्ज यंत्रणेच्या दाव्यातील फोलपणा
2 कोल्हापूर: पावसाने घेतली उसंत,धरणातील विसर्गामुळे महापुराचा धोका
3 पंचगंगा स्मशानभूमी येथे गॅसदाहिनी सुरु
Just Now!
X