करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत टाळेबंदीत कोणताही कार्यक्रम धार्मिक स्थळी एकत्र येऊन साजरा करण्यास प्रतिबंध केला आहे. मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रमजान ईदचे नमाज घरीच पठण करावे, असे आवाहन प्रमुख मौलाना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेले आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर, मालेगावातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुमारे १८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या हालचालींवर चार ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे.

मालेगावातील मुस्लिम बांधवांनी रमजानच्या पवित्र महिन्यात दर शुक्रवारची नमाज घरीच पठण केली. त्याचप्रमाणे रमजान ईदची नमाज घरीच पठण करून सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख डॉ. आरती सिंग यांनी केले आहे.

याबाबत मालेगाव परिसरातील सर्व प्रमुख धार्मिक, राजकीय, सामाजिक नेत्यांची बैठक झाली. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती ईस्माईल कासमी, माजी आमदार आसिफ शेख रशिद शेख, मौलाना अब्दुल हमिद अजहरी, मौलाना फिरोज आझमी आदी उपस्थित होते.

सर्वानी रमजान ईदची नमाज घरीच पठण करण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम समाजाच्या धार्मिक प्रमुखांनी कोणीही ईदगाह अथवा मस्जिद या ठिकाणी नमाज पठण करणार नाही, तसेच शासनाच्या आदेशाचे सर्वजण पालन करतील, असे आवाहन चित्रफितीद्वारे केले आहे.

बंदोबस्त तैनात

ईदच्या पार्श्वभूमीवर, चार ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. मालेगाव शहरात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या मोठी आहे. ग्रामीण पोलीस दलाने दोन पोलीस अधिक्षक, दोन अपर पोलीस अधिक्षक, दोन पोलीस उपअधिक्षक, २२ निरीक्षक, ८३ अधिकारी, राज्य राखीव दलाच्या सहा तुकडय़ा, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि शीघ्र कृती दलाची प्रत्येकी एक तुकडी असा सुमारे १८०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.