नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिसांच्या रडारवर आलेले दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक साईबाबा यांच्या बचावासाठी दिल्लीतील प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांनी गृह मंत्रालयाला साकडे घातले आहे, तर दुसरीकडे गडचिरोली पोलिसांनी साईबाबा यांना जबाब नोंदविण्यासाठी तातडीने हजर होण्याची नोटीस बजावली आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक असलेले जी. एन. साईबाबा यांच्या विद्यापीठ परिसरातील निवासस्थानावर गडचिरोली पोलिसांनी गेल्या आठवडय़ात छापा टाकून नक्षलवादी चळवळीशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली होती. या कागदपत्रांची छाननी सध्या पोलीस करीत आहेत. साईबाबा यांच्या घरून जप्त करण्यात आलेले संगणक तसेच हार्ड डिस्कमध्ये असलेल्या मजकुराची तपासणी सध्या सुरू आहे. गडचिरोली पोलिसांनी अटक केलेल्या हेम मिश्रा व प्रशांत सांगलीकर या दोघांनी दिलेल्या जबाबात साईबाबा यांचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याने या चळवळीचे समर्थन करणारे दिल्लीतील विचारवंतांचे वर्तुळ सध्या अस्वस्थ आहे. पोलीस नाहक आपल्याला त्रास देत आहेत, असा दावा साईबाबा यांनी गेल्या आठवडय़ात केला होता. त्यांच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक संघटना पुढे सरसावली असून, या संघटनेच्या वतीने बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाला एक निवेदन देऊन साईबाबा यांचा छळ थांबवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.  
नक्षलवादी विचारांचे केंद्र असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीसुद्धा याच आशयाचे निवेदन गृह मंत्रालयाला दिले आहे. या माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे हे प्रकरण हाताळत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान साईबाबा यांच्या घरातून जप्त करण्यात आलेली बरीच कागदपत्रे नक्षलवादी चळवळीशी संबंधित आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा खुलासा होण्यासाठी साईबाबा यांचा जबाब नोंदवणे गरजेचे आहे. म्हणूनच साईबाबा यांना जबाब नोंदविण्यासाठी अहेरीतील प्राणहिता पोलीस मुख्यालयात बोलाविण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. जबाब देण्यासाठीची नोटीस मिळताच साईबाबा यांनी त्याला उत्तर देण्याऐवजी वकिलांचा सल्ला घेतल्यानंतरच नोटिशीला उत्तर देईन असे पोलिसांना कळविले आहे.