राष्ट्रवादीकडून भाजपवर प्रहार, पंतप्रधान मोदींच्या शंभर दिवसांच्या कारभारावर टीका, दुसऱ्या बाजूला भाजपकडून राष्ट्रवादी, काँग्रेसवर घोटाळय़ांचा आरोप, शिवसेनेची दोन्ही काँग्रेससह भाजपवर टीका, मनसेचे या सर्वानाच झोडपणारे धोरण.. जाहीर सभांचे फड याच रंगांनी रंगले. प्रचाराचे दोन दिवसच हाती आहेत. नेत्यांची सभा लागताच उमेदवारांची होणारी तारांबळ, सभास्थळापासून हेलिपॅडपर्यंत सगळी तयारी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सभेस गर्दी जमवताना होणारी दमछाक असा प्रकार या सभांच्या निमित्ताने पाहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर, पंकजा मुंडे आदी नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी जाहीर सभांना हजेरी लावली. सभा व प्रचारामुळे वातावरण ढवळून निघाले. मात्र, प्रत्यक्षात विकासाचे मुद्दे बाजूलाच राहिले. प्रचाराचे तीन दिवस व दोन रात्री शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघांत प्रचार शिगेला पोहोचला आहे. गंगाखेडमध्ये मात्र अजूनही उमेदवाराकडून थेट मतदारांना पसेवाटपाचे काम दिवसाऐवजी आता ‘रात्रीच्या उजेडा’त सुरू आहे. निवडणुकीत स्थानिक प्रश्न फारसे चच्रेला न येता सर्वच पक्षांचे नेते देश-राज्य पातळीवरील नेत्यांविरुद्ध टीका करीत आहेत. उमेदवारांकडूनही स्थानिक प्रश्नांचा ऊहापोह फारसा होत नाही. वास्तविक, कुठल्याच उमेदवाराकडे केलेले काम सांगण्याची सोय नाही व काय करणार याचे नियोजन नाही. त्यामुळे हा गोंधळ उडताना दिसत आहे.
दि. १ ऑक्टोबरपासून खऱ्या अर्थाने प्रचार सुरू झाला. सोमवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजता प्रचाराचे ताबूत थंडावतील. उमेदवारांना ११-१२ दिवसच प्रत्यक्ष प्रचारास मिळाले. प्रचाराचा कमी अवधी, नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांच्या बठका यामुळे उमेदवाराला प्रत्येक गावात पोहोचता आले नाही. प्रचारात सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या जाहीर सभा जिल्ह्यात झाल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप देशमुख, बाबाजानी दुर्राणी, विजय भांबळे, डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासाठी शरद पवार यांची परभणीत, तर अजित पवार यांनी पूर्णा, सेलू येथे सभा घेतल्या. भाजपच्या पंकजा मुंडे यांची गंगाखेड व जिंतूर, रासपचे महादेव जानकर यांची गंगाखेड, पालमला सभा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परभणीत सभा झाली. राज ठाकरे पाथरीत सभा घेऊन गेले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी परभणीत व्यापाऱ्यांशी संवाद साधला, तर रिपाइंचे रामदास आठवले व राखी सावंत यांची पूर्णेत सभा झाली.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची परभणीच्या नवा मोंढय़ात उद्या (शनिवारी) सकाळी ११ वाजता सभा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारी परभणीत येत आहेत. येत्या दोन दिवसांत इतर नेत्यांच्याही अचानक सभा होण्याची शक्यता आहे.
मात्र, आतापर्यंत जाहीर सभांमधून नेत्यांची ठरलेली तीच ती भाषणे आणि तेच ते मुद्दे असे स्वरूप राहिले. राज्याच्या वेगवेगळय़ा भागांत नेत्यांच्या होणाऱ्या जाहीर सभा घरबसल्या वेगवेगळय़ा वृत्तवाहिन्यांवरून ‘लाइव्ह’ पाहण्याची सोय उपलब्ध झाली. त्यामुळेच नेत्यांची भाषणे सर्वत्र सारख्याच पद्धतीची होत असल्याचे दिसून येते. स्थानिक नेत्यांनी व उमेदवारांनी विकासाचे मुद्दे लावून धरावेत, असे अपेक्षित असले, तरीही जिल्ह्यात असे मुद्दे अजूनही चच्रेला आले नाहीत.