विलासराव देशमुख यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून शहर बसवाहतूक सेवेचा थाटामाटात प्रारंभ झाला. मात्र, सुरुवातीपासूनच नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नेच्या धर्तीवर अडचणी सुरू झाल्या असून मनपाची मात्र यात छी-थू होत आहे.
केंद्र सरकारचे दीड वर्षांपूर्वी शहर बसवाहतुकीसाठी १०० टक्के अनुदान मंजूर झाल्यानंतर चार महिन्यांत लातूर शहरवासीयांसाठी ६० बसेस दाखल होतील, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर अडचणीची मालिका वाढत गेली. शहर बसवाहतूक सेवा सुरू होते की नाही? असे वाटत असतानाच विलासराव देशमुख यांच्या ७० व्या जयंतीचा मुहूर्त ठरवण्यात आला. मुहूर्त चुकू नये, या साठी ६० बसेसऐवजी दोन बसेस शुभारंभासाठी आणण्याचे ठरले व कार्यक्रम पार पडला. अशोक लेलँड कंपनी व टाटा कंपनीची अशा दोन गाडय़ा उद्घाटनप्रसंगी होत्या. टाटा कंपनीने उद्घाटनासाठी डेमो गाडी पाठवत असल्याचे पत्र महापालिकेस दिले. मात्र, ते अधिकाऱ्यांनी पाहिलेच नाही. त्यामुळे उद्घाटनानंतर टाटाने गाडी परत मागवली. एका गाडीवरच बससेवा सध्या सुरू आहे!
आगामी आठवडाभरात ३-४ गाडय़ा येतील व उर्वरित गाडय़ा येण्यास महिना-दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. मनपाचा ढिसाळ कारभार लक्षात घेऊन रिपाइंचे चंद्रकांत चिकटे यांनी शहर बसचा रंग संमती न घेताच हिरवा करून टाकला. या कारणास्तव महापौरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खुर्चीला हिरवी साडी व बांगडय़ांचा आहेर करण्यात आला. या प्रकारामुळे महापौर चांगलेच संतप्त झाले. या प्रकरणी रीतसर तक्रार करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिवसनिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांना दिलेल्या निवेदनात महापालिका प्रशासनाने लातूरकरांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शहर बसवाहतूक सेवेच्या नमनालाच घडाभर तेल लागल्यामुळे आता सर्व बसेस सुरू होण्यास किती तेल लागेल? याची चर्चा सुरू झाली आहे.
विलासरावांचा अवमान!
विलासरावांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून मनपाने शहर बसवाहतूक सेवेस प्रारंभ केला खरा. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी शुभारंभानंतर बसवाहतूक सेवेची केविलवाणी अवस्था झाल्यामुळे एक प्रकारे विलासरावांचाच अवमान झाल्याचे बोलले जात आहे. शुभारंभानंतर बस येण्यास वेळ लागेल, हे प्रशासनाला माहीत नव्हते का? विलासरावांच्या कारकीर्दीत त्यांचा असा अवमान कधी झाला नव्हता. मनपा प्रशासनाने आता तरी याची जाणीव ठेवून लवकरात लवकर बससेवा सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.