व्यावसायिक नाटय़ निर्माता संघात फूट; पाच सदस्यांच्या राजीनाम्यांमुळे कार्यकारणी बरखास्त

रंगमंच कलावंत, कामगारांना वृद्धापकाळात, आजारपणात आर्थिक मदतीसाठी राखीव असलेल्या ‘व्यावसायिक नाटय़ निर्माता संघा’च्या निधीतील १४ लाख रुपये २८ निर्मात्यांना देण्याच्या मुद्यावर संघाच्या कार्यकारणीत फू ट पडली. गरजूंऐवजी इतरांनीच मदतनिधी घेतल्यावरून पाच कार्यकारणी सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

‘निर्माता संघ सदस्य किंवा इतर कुणाही व्यक्तीला संघटनेकडून मदतनिधी द्यायचा असेल तर संस्थेची घटना, नियमांचा अभ्यास करून कायद्याच्या चौकटीत राहून देणे आवश्यक होते. निधी वाटपाबाबतचे धोके वेळोवेळी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष म्हणून सुरुवातीलाच हा प्रस्ताव नाकारण्याचा कटू निर्णय फार पूर्वी कार्यकारणीला कळवला होता,’ असे संघाचे अध्यक्ष अजित भुरे यांनी सांगितले. अजूनही निधीवाटपाची ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या निकषांवर मान्य होईल का, याबाबत साशंक असल्याने आणि त्यासाठी लढण्यास माझ्याकडे पुरेसा वेळ नसल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे भुरे यांनी स्पष्ट के ले.

संघाचे कार्यवाह राहुल भंडारे यांनी निधी वाटपाचे समर्थन केले. ‘टाळेबंदीमुळे रंगमंच कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्यासाठी निधी उभारण्याचे काम मोठय़ा स्तरावर केले गेले. परंतु गेले तीन महिने नाटक बंद असल्याने निर्मातेही अडचणीत आल्याने त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे संघातील सदस्यांनी बहुमताने राखीव निधीतील १४ लाख निर्मात्यांना देण्याचा निर्णय घेतला,’ असे भंडारे म्हणाले. निर्मात्यांना निधी देण्यास काही सदस्यांचा विरोध असल्याने राजीनाम्याची भूमिका घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

‘नाटक केले आणि चालले नाही तर निर्मात्याचे लाखो रुपयांचे नुकसान होते. नाटक बंद असलेल्या निर्मात्यांना या मदतीने दिलासा मिळेल. त्यामुळे निर्माता संघाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते,’ असे भंडारे यांना वाटते. परंतु, निधी देण्यात आलेल्या २८ निर्मात्यांपैकी १९ निर्मात्यांनी गेल्या काही वर्षांत रंगभूमीवर नाटकच आणलेले नाही. मग त्यांचे नुकसान कसले झाले आणि त्यांना निधी का द्यावा, असा सवाल निर्मात्यांना निधी देण्यास विरोध करताना प्रशांत दामले यांनी केला. त्यांच्या मते, निर्माता संघाच्या बैठकीत रंगमंच कामगारांना निधी द्यावा याबाबत एकवाक्यता झाली होती. परंतु रंगमंच कामगारांना बाजूला सारून निर्मात्यांच्याच मदतनिधीची टूम निघाली. त्यालाही आमचा विरोध नव्हता. परंतु ज्या मार्गाने निधी देण्यात आला ती प्रक्रिया गैर होती. गेली ५० वर्षे निर्मात्यांनी उभारलेला निधी अशा स्वरुपात वापरला जाणे योग्य नाही, अशा शब्दांत दामले यांनी नाराजी व्यक्त केली.

‘निर्मात्यांनी रंगमंच कामगारांआधी स्वत:साठी निधीचे धनादेश काढले. हीच तत्परता रंगमंच कामगारांसाठी मंजूर केलेल्या दोन लाखांच्या निधीसाठी का दाखवण्यात आली नाही. निर्मात्यांना निधी जरूर मिळावा, पण सर्वसाधारण सभा, धर्मादाय आयुक्तांची परवानगी अशा कु ठल्याही नियमांची पूर्तता न करता के वळ बहुमतावर निधी वापरण्याच निर्णय योग्य नाही,’ अशी भूमिका राजीनामा देणाऱ्या संघाच्या कोषाध्यक्षा वैजयंती आपटे यांनी घेतली आहे.

कलावंतांना, निर्मात्यांना वृद्धापकाळात, आजारपणात आर्थिक मदत करता यावी यासाठी संघाचा राखीव निधी असतो. रंगमंच कामगारांना पैसे मिळालेच पाहिजे. पण करोना काळात निर्माते दोन महिन्यांत अडचणीत येतात, हे न पटण्यासारखे आहे. त्यातही गरजू निर्मात्यांना निश्चितच मदत करावी, पण सरसकट मदत करण्याला विरोध आहे.

– सुनील बर्वे, कार्यकारणी सदस्य, अभिनेता-निर्माता

निवडणूक ऑगस्टमध्ये

कार्यकारणीतील १५ सदस्यांपैकी महत्त्वाच्या पदांवरील पाच जणांनी राजीनामा दिल्याने कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यवाह राहुल भंडारे यांनी ऑगस्टमध्ये व्यावसायिक नाटय़निर्माता संघाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. कार्यकारणी बरखास्तीचे कारण पाहता या निवडणुका चांगल्याच गाजण्याची चिन्हे आहेत.

वादाचे कारण : टाळेबंदीमुळे गेले तीन महिने नाटक बंद असल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या निर्मात्यांना मदत म्हणून हा निधी देण्यात आल्याचे निधी वाटपाचे समर्थन करणाऱ्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. मात्र हा निधी अडचणीत असलेल्या पडद्यामागील गरजू कामगारांना देण्याऐवजी काही वर्षे नाटय़निर्मितीपासून दूर असलेल्या निर्मात्यांना नियम डावलून दिल्याने, कार्यकारिणीचे अध्यक्ष अजित भुरे यांच्यासह विजय केंकरे, वैजयंती आपटे, सुनिल बर्वे, प्रशांत दामले यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संघाचे अध्यक्ष अजित भुरे यांनी निधीवाटपाबाबतच्या प्रक्रि येवर आक्षेप घेत राजीनामा दिला आहे.